दखने हायस्कुलमध्ये निःशुल्क मोतीबिंदु तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

0
4

– स्व. बळीरामजी दखने यांच्या जयंतीनिमित्त २८४ नागरिकांची नेत्र तपासणी; १८० जणाना चष्म्यांचे वाटप

कन्हान :- शहरातील बळीरामजी दखने हायस्कुलचे संस्थापक अध्यक्ष स्व. बळीरामजी दखने यांच्या जयंतीचे औचित्य साधुन रामकृष्ण मठ धंतोली, नागपुर, महात्मे नेत्र रुग्णालय आणि बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या परिसरात निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदु तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सचिन अल्लडवार तर प्रमुख अतिथी म्हणुन पर्यवेक्षक यतीन पशीने, स्वामी ब्रह्ममयानंदजी महाराज, स्वामी महाबलानंदजी महाराज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि स्व. बळीरामजी दखने यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक सचिन अल्लड वार यांनी स्व. बळीरामजी दखने यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजाती ल गरजु नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

महात्मे नेत्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने एकुण २८४ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १८० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर ८० रुग्णांची मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी निवड करून त्यांना महात्मे नेत्र रुग्णालयात पुढील उपचारा साठी नेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भाग्यश्री नखाते यांनी तर आभार प्रदर्शन नागोराव चव्हाण यांनी केले.

शिबिराच्या यशस्वितेकरिता मुख्याध्यापक सचिन अल्लडवार, शिक्षिका भाग्यश्री नखाते, शिक्षक डी.एन. बांबल, अमित थटेरे, धनविजय, एन.आर. चौहान, विलास उईके, माधव काठोके, दिवाकर शेंडे, देवरस, राऊत यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.