spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोबरवाही पोलिसांचा अवैध रेती तस्करांवर मोठा प्रहार; ८० लाखांच्या मुद्देमालासह दोन ट्रक जप्त

– नागपूरच्या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात मोठी कारवाई

हंसराज, प्रतिनिधी भंडारा गोबरवाही :- अवैध रेती वाहतुकीविरोधात गोबरवाही पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, ८० लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बावनथडी खापारोंघा लेंडेझरी चौफुलीवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन ट्रकसह १२ ब्रास रेती पकडण्यात आली असून नागपूर जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिनांक १४ जानेवारी रोजी गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पेंदाम हे आपल्या ताफ्यासह परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी बावनथडीकडून खापारोंघा लेंडेझरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ट्रक संशयास्पद रितीने येताना दिसले. पोलिसांनी इशारा करून ट्रक थांबवले आणि तपासणी केली असता, दोन्ही ट्रकच्या मागील डाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेती भरलेली आढळून आली.

पकडण्यात आलेल्या ट्रकमध्ये पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड ट्रक (क्र. MH 34 BG 5567) आणि निळ्या रंगाचा अशोक लेलँड ट्रक (क्र. MH 40 AK 0615) यांचा समावेश आहे. पोलिसांनी ट्रक चालकांकडे रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी ४० लाख रुपये किमतीचे दोन ट्रक (एकूण ८० लाख रु.) आणि प्रत्येकी ६ ब्रास याप्रमाणे एकूण १२ ब्रास रेती (किंमत ६० हजार रु.) असा एकूण ८० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे.

या प्रकरणी भूषण देवीदास भुरे (वय ३०, रा. कानठी, ता. कामठी, जि. नागपूर) आणि अश्विन हरिचंद भोवते (वय २९, रा. कामठी, जि. नागपूर) या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोबरवाही पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम ७, ९ अन्वये गुन्हा (अप. क्र. १९/२०२६) नोंदवण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पेंदाम व गोबरवाही पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास गोबरवाही पोलीस अधिकारी करत आहेत.

Popular Articles