– आमदार चरणसिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती; गोशाळेला १५ दिवसांत बोअरवेलची सुविधा
नरखेड :- अमृत गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, नरखेड येथे गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. वसुबारसपासून सुरू झालेल्या धार्मिक व सामाजिक उपक्रमाची सांगता गोवर्धन पूजनाने करण्यात आली. यावेळी आमदार चरणसिंह ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य सनतकुमार गुप्ता होते. यावेळी नागपूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके, डॉ. महाजन, नगराध्यक्ष मनोज कोरडे, सहायक आयुक्त डॉ. मुकिंदा जोगेकर, डॉ. वसुधा नायर, वनदेवी आश्रमाच्या साध्वी अर्पिता दीदी, ह.भ.प. रोशन महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष हरीश खंडेलवाल आणि कोषाध्यक्ष सुरेंद्र शर्मा उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गोपूजन, गोवर्धन पूजन आणि भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या पूजनाने झाली. यावेळी मान्यवरांनी गोवंशाचे धार्मिक, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व विशद केले. गोवंश संवर्धन आणि गोसेवेची गरजही अधोरेखित केली.
गोशाळेतील जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता आमदार चरणसिंह ठाकूर यांनी येत्या १५ दिवसांत बोअरवेल करून पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव पुरुषोत्तम थोटे यांनी केले. संचालन रामेश्वर सेंदरे यांनी, तर आभार प्रदर्शन गुणवंत गिरडकर यांनी केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त संजय गुरव, भगवान गिरडकर, दीपक ढोमने, मनीष दुर्गे, योगेश मांडवेकर, पंकज कुरेकर यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. गोसेवा आणि गोवंश संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.






