spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री संजय राठोड

 पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी

 यवतमाळ, दि. २६ : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका उमरखेड, महागाव तालुक्याला बसला. आज पालकमंत्र्यांनी या दोनही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्री म्हणाले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री राठोड यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किसन वानखडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उमरखेड तहसीलदार राजु सुरडकर, महागाव तहसिलदार मस्के, पराग पिंगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यात सहभागी होते.

पालकमंत्र्यांनी यावेळी महागाव तालुक्यातील फुलसावंगी, उमरखेड तालुक्यातील नारळी, कुरली, चिखली, कोरटा, दराटी या गावाला भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या, व्यथा जाणून घेतल्या. या गावांमधील शाळा, आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी घेतली.

शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पुर्ण करा. नुकसानीचे सर्वे करतांना तपशीलवार नोंद घ्यावी. अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे, घरांचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

शेतपिके, शेतजमीनी, खरडून गेलेल्या जमिनींची स्वतंत्र अहवाल करण्यात यावे. खरडून गेलेल्या जमिनींनी शेतकऱ्यांना दुरुस्त करतांना फार मोठा खर्च येतो. त्यामुळे अशा जमिनींसाठी जास्तीत जास्त रक्कम मिळवून देण्याच प्रयत्न करू. नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाने तत्काळ 10 हजाराची आर्थिक मदत येत्या दोन दिवसात देऊन त्यांना दिलासा द्यावा, असे निर्देशही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

पाहणीनंतर उमरखेड येथे नुकसानीचा आढावा

दोनही तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी उमरखेड येथे नगर परिषद गार्डन हॅाल सभागृहात नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. दोनही तालुक्यातील पुरपरिस्थीती व नुकसानीची माहिती त्यांनी घेतली. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, जनावरांचे मृत्यू, शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे. नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल,असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.