spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्यपालांच्या हस्ते भिकू इदाते, रवींद्र प्रभूदेसाई यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

– वाढदिवस तसेच विवाह प्रसंगी ग्रंथ भेट देण्याची प्रथा सुरू व्हावी: राज्यपाल

मुंबई :- भटके विमुक्त विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व समरसता मंचचे दीर्घ काळ कार्याध्यक्ष राहिलेले पद्मश्री भिकु (दादा) इदाते यांच्या इंग्रजी अनुवादित ‘पिलग्रीम ऑफ समरसता’ या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन मुंबई येथे झाले.

नीलिमा देशपांडे यांनी दादा इदाते यांच्या जीवन कार्यावर लिहिलेल्या ‘समरसतेचा वारकरी’ या ग्रंथाचे सदर ग्रंथ हे इंग्रजी भाषांतर असून ऋतुराज पत्की यांनी ते अनुवादित केले आहे. ग्रंथाला सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची प्रस्तावना आहे.

राज्यपालांच्या हस्ते उद्योजक तसेच पितांबरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ रवींद्र प्रभूदेसाई यांच्या ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ व ‘आपलं कोकण’ या दोन पुस्तकांचे देखील लोकभवन येथे प्रकाशन करण्यात आले.

भिकू इदाते यांच्या पुस्तकामुळे वाचकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता तसेच इतर आंदोलनाची माहिती होईल आज तंत्रज्ञानाच्या काळात देखील ग्रंथांचे महत्त्व कायम असून ग्रंथ हाती धरून वाचणे हा अद्भुत अनुभव असतो असे राज्यपालांनी सांगितले. नवी पिढी ग्रंथ वाचन करीत नाही हा समज चुकीचा आहे असे सांगून नव्या पिढीने वाचनाचे केवळ व्यासपीठ बदलले आहे वाढदिवस तसेच विवाह प्रसंगी ग्रंथ भेट देण्याची प्रथा सुरू व्हावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

लेखक भिकू इदाते यांनी आपल्या प्रास्ताविकातून समरसता मंचाची निर्मिती, त्या माध्यमातून हाती घेतलेली वेगवेगळी आंदोलने, फुले आंबेडकर संदेश यात्रा, विमुक्त व भटक्या समाजाची स्थिती इत्यादी विषयांवर विवेचन केले.

‘पितांबरी’चे रवींद्र प्रभुदेसाई यांनी ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ व ‘आपलं कोकण’ या ग्रंथांविषयी माहिती दिली.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हिंदुस्तान प्रकाशन संस्था व साप्ताहिक विवेकचे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे तसेच साप्ताहिक विवेक तसेच पितांबरी उद्योग समूहातील संचालक उपस्थित होते.

Popular Articles