कामठी :- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, कामठी सेवा केंद्राच्या वतीने संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका प्रकाशमणि यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्व बंधुत्व दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवता, बंधुभाव आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिक व सेवाधाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. डॉ. संजय राठी, बी.के. प्रेमलता, पोलीस विभागाचे प्रशांत सलामे, दीपक अग्रवाल, शेषराव अढाऊ व राजेश आहुजा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी डॉ. संजय राठी यांनी दादी प्रकाशमणिजी यांच्या सेवा, त्याग, प्रेम आणि विश्व बंधुत्वाच्या विचारांचे स्मरण करून रक्तदान हे मानवसेवेचे श्रेष्ठ माध्यम असल्याचे सांगितले. बी.के. प्रेमलता यांनी विश्व बंधुत्वाचा खरा अर्थ एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि गरजेच्या वेळी मानवतेच्या भावनेतून मदतीसाठी पुढे येणे हा असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाला सरपंच पंकज साबळे, असरार, पराग सपाटे, पंकज नालंद्रेवार व पटेल भैय्या यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी ब्रह्माकुमारीज कामठी सेवा केंद्राच्या या सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांना रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ‘रक्तदान—महादान, मानवसेवा हीच खरी सेवा’ हा संदेश या माध्यमातून जनमानसात पोहोचविण्यात आला.
दादी प्रकाशमणि यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित हे रक्तदान शिबिर प्रेम, करुणा, सेवा आणि विश्व बंधुत्वाच्या भावनेचा जागर करणारे ठरले. शिबिराच्या यशस्वितेसाठी सहकार्य करणारे मान्यवर, रक्तदाते, वैद्यकीय पथक व सेवाधाऱ्यांचे आयोजकांनी आभार मानले.








