हरित रामटेकचा संकल्प : २५ हजार सीडबॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण

0
74

 

सचिन चौरसिया, रामटेक २१ – समर्थ हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, रामटेक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सृजनशील उपक्रम राबविला. जीवशास्त्र विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तब्बल २५ हजार सीडबॉल तयार करून गड मंदिर ते नागार्जुन मंदिर या सुमारे चार किलोमीटरच्या परिसरात फेकण्यात आले. समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव व सृष्टी सौंदर्य संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश किंमतकर यांनी विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या प्राचार्या ममता लोखंडे  यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रोत्साहन करत त्यांना सहकार्य केले. सीडबॉल प्रोजेक्टच्या यशस्वीतेसाठी जीवशास्त्र विभाग प्रमुख नंदेश शेळके, उपप्राचार्य आर. व्ही. गायकवाड , प्राध्यापक देशमुख, सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी कांद्री माईनचे प्रबंधक आणि  राजेंद्र मुळक यांच्या कडुन बसची सोय करण्यात आली. ऋषिकेश किंमतकर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शेंगदाणा चिक्की व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली. फेकलेले सीडबॉल भविष्यात हिरवळीत रूपांतर होऊन गडमंदिर ते नागार्जुन मंदिर परिसर हरित होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली. सीडबॉल कापडी व प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून नेण्यात आले होते व त्यांचा योग्य पुनर्वापर केला गेला. टेकडी परिसर, झाडांना कोणताही त्रास न देता, सर्व उपक्रम निसर्गस्नेही पद्धतीने राबविण्यात आला. चॉकलेट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेष्टन शाळेत परत आणून अनुशासनाचे उत्तम उदाहरण घालून दिले. समर्थ विद्यालयातर्फे वेळोवेळी असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात असून, पर्यावरण संतुलनासाठी हे महत्त्वाचे योगदान ठरत आहे