अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड .धर्मपाल मेश्राम
नागपूर, दि. २१ – अनुसुचित जाती जमाती आयोगाच्या वतीने 22 जुलै 2025 ते 22 जुलै 2026 या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत अनुसुचित जाती आणि जमातीच्या तक्रारकर्त्यांसाठी तक्रार निवारण जनसुनावणी परिषद आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अनुसुचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रवी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे आदी यावेळी उपस्थित होते.
जनसुनावणीसंदर्भात आज नागपूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेतली. यात विविध योजना व उपक्रम, ॲट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षभरातील अनुसुचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचे निवारण जनसुनावणी परिषदेच्या माध्यमातून व्हावे असा प्रयत्न आहे. अनुसुचित जाती व जमातींच्या नागरिकांसाठी 22 जुलै जनसुनावणी परिषदेचे आयोजन डॅा. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे करण्यात आले असल्याचे ते यावेळी म्हणाले.
जनसुनावणी परिषदेच्या माध्यमातून अनुसुचित जाती जमातींच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी पुढे सरसावण्याचा प्रयत्न आहे. अनुसुचित जाती जमातीच्या विकासासाठी आयोग कटिबद्ध आहे. या विकास प्रक्रियेत नागरिकांचेही योगदान आवश्यक असल्याचे ॲड. मेश्राम यावेळी म्हणाले.
21 जुलै अनुसुचित जाती जमातीसाठीच्या विविध योजना व उपक्रम, ॲट्रॅासिटीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले.



