नागपूर, १ :दाभा चौक ते सुलोचना गायकवाड यांच्या घरापर्यंतच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचे श्रीपूर्णानगर येथे राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमात आमदार विकास ठाकरे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. माजी आमदारसुधाकर कोहळे, मनपाच्या सहाय्यक आयुक्त स्नेहलता कुंभार, माजी महापौर मायाताई इवनाते, माजी नगरसेवक संदीप जाधव, माजी नगरसेविका परिणिता फुके, दर्शनी धवड, नरेश बरडे, साधना बरडे, विक्रम ग्वालवंशी, नरेंद्र ग्वालवंशी, साधना ग्वालवंशी, प्रा. गिरीश देशमुख, सुनील मौर्य प्रमोद कौरती, मनपाचे कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, उप अभियंता मोकाडे, नवघरे यांच्यासह इतर अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांसाठी घरे अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतून नागरिकांना किफायतशीर घरं उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. याशिवाय शहरात एआय तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेरा सर्व्हिलेन्स लावण्यात येणार असून, पुढील काळात सर्व मालमत्ताधारकांना घरांचे प्रॉपर्टी कार्ड देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्य शासनातर्फे मनपाच्या माध्यमातून दाभा परिसरात विविध विकासकामे केली जात असून पुढेही अशीच कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
आमदार विकास ठाकरे यांनी आपण पश्चिम नागपूरच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असल्याचे सांगत, प्रभाग १२ च्या विविध विकास कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली.
तर माजी महापौर मायाताई इवनाते यांनी नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेता येथील सिमेंटीकरणाच्या कामाला मंजुरी दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केल व आभारी ही व्यक्त केले.
या कामामुळे परिसरातील नागरिकांना लवकरच एक सुरक्षित आणि सोयीचा रस्ता उपलब्ध होणार आहे. मेसर्स द्वारका कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडे या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याकामाकरिता १,१९,७४,६२४ रुपये रकमेचा कार्यादेश देण्यात आला आहे. भूमिपूजन करण्यात आलेला प्रस्तावित रस्ता ६०० मीटर लांबीचा आणि ९ मीटर रुंदीचा आहे सिमेंटीकरणासोबतच पावसाळी नाल्यांचे बांधकामही येथे केले जाणार आहे. दाभा चौक ते वाडी कडे जाणारा हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, सिमेंटीकरणानंतर तो वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित आणि सोयीचा होईल.




