– हजरत बाबा ताजुद्दीन महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा; डॉ.प्रमोद लाखे यांचे मार्गदर्शन
नागपूर :- स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा तसेच विविध शासकीय क्षेत्रांत करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण अभ्यासाला सुरुवात करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य भारतीय प्रशासकीय सेवा कोचिंग सेंटर, नागपूरचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी केले. हजरत बाबा ताजुद्दीन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, ताजाबाद शरीफ, उमरेड रोड, नागपूर येथे ‘स्पर्धा परीक्षांबद्दल जागरूकता व त्याची तयारी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हजरत बाबा ताजुद्दीन कॉलेज, यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, अंजुमन कॉलेज तसेच उम्मे सलमा विज्ञान व कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा पार पडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शादाब एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल जब्बार होते. प्रमुख अतिथी म्हणून सोसायटीचे सचिव मोहम्मद शादाब अब्दुल सलीम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. तुषार चौधरी, प्राचार्य डॉ. मनिष बिहाडे, डॉ. अमोल राऊत यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. प्रास्ताविकात हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शकील सत्तार यांनी स्पर्धात्मक युगातील विविध करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षांचे वाढते महत्त्व आणि योग्य वेळी तयारी सुरू करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. डॉ. लाखे यांनी एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासक्रमाचे आकलन, संदर्भ साहित्याची निवड, वेळेचे नियोजन, चालू घडामोडींचा अभ्यास, नियमित सराव, सराव परीक्षा व लेखन कौशल्य याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशासाठी बुद्धिमत्ते बरोबरच नियोजन, सातत्य, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. डॉ.लाखे यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी कशी व कोणत्या टप्प्यावर सुरू करावी, याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्ट दिशा मिळाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.जरीना खान यांनी तर आभार प्रा.नेहा शेख यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. शकील सत्तार यांच्यासह चारही महाविद्यालयांतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यशाळेमुळे स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळाले.
-डॉ. शकील सत्तार, प्रमुख आयोजक





