यवतमाळ :- सध्या पावसाने उघड दिल्याने शेतीतील फवारणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून वाढत्या तापमानात शेतकरी व शेतमजूर उघड्या अंगाने कीटकनाशक फवारणी करत असल्याने विषबाधेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राळेगाव तालुक्यातील कारेगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सिंजेंटा इंडिया प्रा. लि. व इसार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मार्गदर्शन शिबिरात फवारणीसंबंधी सुरक्षिततेच्या महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी संपूर्ण अंग झाकणारे कपडे, मास्क, हातमोजे, गॉगल आणि गम शूज वापरावेत. सकाळी किंवा संध्याकाळच्या थंड हवामानात फवारणी करावी. वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी टाळावी, पंपाचे नोझल शरीरापासून दूर ठेवावे. उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करूनच काम सुरू करावे. तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. जास्तीत जास्त आठ तासांपेक्षा जास्त वेळ फवारणी करू नये. फवारणी नंतर अंग, हातपाय साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावेत, आंघोळ करावी. वापरलेले साहित्य नद्या-विहिरीजवळ धुणे टाळावे. विषारी कीटकनाशक ओळखण्यासाठी डब्यावरचे रंग व चिन्ह पाहावे. पंप गळत असल्यास दुरुस्त करावा, जखमी व्यक्तींनी फवारणी करू नये. विषबाधेची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात जावे.
फवारणीसाठी कीटकनाशके तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच वापरावीत व खरेदी करताना बिल, उत्पादन व समाप्तीची तारीख तपासावी, असेही कृषी विभागाने सांगितले.
या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी राहुल मनवर, सहाय्यक कृषी अधिकारी शितल एडमे, सिंजेंटा कंपनीचे आशिष मोघे, उपसरपंच वैभव नंदुरकर यांच्यासह गावातील अनेक शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.








