आरोग्य कर्मचाऱ्यांचा मेळावा उत्साहात; सेवानिवृत्तांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0
57

अमरावती :- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (२५७/८९) अमरावती यांच्या वतीने आयोजित आरोग्य कर्मचाऱ्यांचा मेळावा – २०२६) नुकताच कर्मयोगी गाडगे महाराज मंदिर हॉल, अमरावती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॅग्मो संघटना अमरावतीचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शिरसाट होते.

या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पूनम मोहकार, डॉ. स्वप्निल मालखेडे, डॉ. सुमित राऊत, डॉ. शरद जोगी तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष गौरव काळे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेले संघटनेचे पदाधिकारी तसेच महिला व पुरुष आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष चंदू काळे यांनी केले. त्यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाकडे करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी सांगितले की, आरोग्य विभागात सध्या विविध नवीन योजना व कार्यक्रम राबविले जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कामाचा अनावश्यक ताण न घेता योग्य नियोजन करून काम करावे व स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रशासकीय दिरंगाईमुळे कोणत्याही कर्मचाऱ्यांचे काम प्रलंबित राहणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

या मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (२५७/८९) अमरावती यांच्या वतीने करण्यात आले असून संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले त्या सर्वांचे संघटनेच्या वतीने अध्यक्ष चंदू काळे व महिला हक्क संरक्षक पुष्पा वानखेडे यांनी आभार मानले. पुढील वर्षी अधिक दर्जेदार नवीन कल्पकता चे आधारे कार्यक्रम आयोजित केले जाईल असे हि दोन्ही अध्यक्षांनी सांगितले.