आषाढी एकादशीनिमित्य सेवाश्रमाचा उपक्रम
बेला :- जवळच्या बरबडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील आदिनाथ गुरुमाऊली सेवाश्रमाचे वतीने यंदाही आषाढी एकादशी निमित्य हिंगणघाट ते बरबडी पायदळ पालखी वारीला आजपासून (२२ जुलै) प्रारंभ होत आहे. यातून भक्तांना भगवंत भेटीची ओढ लागली असून भक्ती भावाचा जागर प्रकट होत आहे.
संत कबीर वार्ड,हिंगणघाट येथील हनुमान देवस्थानातून बुधवारला सकाळी १० वा. दिंडी पालखी,भजन व वारकऱ्यांसह भक्तांची पायदळ वारी मार्गस्थ होत आहे.वारीत सेवाश्रमाचे संस्थापक,ब्रह्ममूर्ती शेषानंद महाराज (भद्रावती) प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आयोजित पायदळ वारीचा परिसरातील भक्तांनी लाभ घ्यावा.असे आवाहन सेवाश्रमाचे अध्यक्ष, ग्रामगीताचार्य ओमप्रकाश पांडे यांनी केले आहे. वारीचा पहिला मुक्काम हिंगणघाट येथील ह भ प रामदास भोयर यांची निवासस्थानी होणार आहे. तेव्हा रात्रीला हरीपाठ व मार्ग दर्शन ममता पांडे करतील यावेळी राजू मेघरे यांचे उपस्थितीत सामूहिक आरती होईल. गुरुवारला सकाळी जाम चौरस्ता मार्गे मजल दरमजल करीत बरबडीकडे आगेकूच करेल. वाटेत शेडगाव येथील स्वामी समर्थ मठात वारकऱ्यांचा मुक्काम होईल.किशोर बाके महाराज यांच्या सहकार्याने,सायंकाळी हरिपाठ सादर करतील.नंतर रात्रीला ग्रामगीताचार्य ओमप्रकाश पांडे महाराज यांचे प्रवचनाचा भक्त लाभ घेतील.शेडगाव येथील संतोष डुकरे यांचेकडून वारकऱ्यांना सहभोजन देण्यात येईल. शुक्रवारला सकाळी शेडगांव येथून मार्गस्थ झालेली पालखी पायदळ दिंडी वारी सायंकाळपर्यंत बरबडी येथील आदिनाथ गुरुमाऊली सेवाश्रमात टाळ मृदंगाच्या गजरात दाखल होईल. तेव्हा आश्रमाच्या वतीने वारकऱ्यांचे गुलाल उधळून उत्स्फूर्त स्वागत होईल.-
आषाढी एकादशीला गंगाजल, अभिषेक
गुरुवार, आषाढी एकादशीला बरबडी येथील सेवाश्रमात शेषानंदबाबा व गुरू आई मंदा यांचे उपस्थितीत पुजाराम खिरटकर व डॉ. श्याम माहुलकर यांचे हस्ते गंगाजल,अभिषेक,पूजन होईल. आरती,तीर्थप्रसाद व अल्पोपहार कार्यक्रमास ग्रामगीताचार्य बेबीताई पिंपळशेंडे व कैलास पेरकुंडे उपस्थित राहतील. पायदळवारीत बुटीबोरी,डोंगरगाव ,वारंगा, चिंधीचक,वनी आणि बरबडी येथील गुरुमाऊली सेवाश्रमाचे भजन मंडळ सहभागी होत आहे. महाप्रसादने उत्सवाची थाटात सांगता होईल.





