spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागरिकांना सेवा तात्काळ देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

– राज्य सेवा हक्क आयुक्तांचे आवाहन

नागपूर :-  नागपूर महानगरपालिका तर्फे सार्वजनिक प्राधिकरणापासून नागरिकांना पुरविलेल्या सेवांच्या दर्जाचे मूल्यमापन करण्याबाबत राज्य सेवा हक्क आयोगाची महत्त्वाची बैठक नागपूर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त श्री संदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त  निर्भय जैन, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त मंगेश खवले, गणेश राठोड,  अशोक घरटे यांच्यासह दहाही झोनचे सहायक आयुक्त व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना संदीप देशमुख यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना मनपाद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा सर्वसामान्य नागरिकांना पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची संकल्पना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. मनपाची सर्व सामान्य नागरिकांशी जवळचा संबंध येतो.

नागरिकांना सर्व सेवा तत्काळ आणि विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, मनपा अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि याचे प्रशिक्षण सुद्धा घ्यावे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चे कलम क्रमांक १९ (१) अनुसार राज्य सेवा हक्क आयोग नागपूरकडून मनपाच्या लोकसेवा पुरविण्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या बैठकीत मनपा अंतर्गत अधिसूचित लोकसेवे संबंधित सर्व झोन व केंद्रीय कार्यालयातील प्रथम अपिलीय अधिकारी आणि द्वितीय अपिलीय अधिकारी देखील उपस्थित होते.

याप्रसंगी उपायुक्त निर्भय जैन यांनी मनपातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती राज्य सेवा हक्क आयुक्तांना दिली. त्यांनी सांगितले की, मनपातर्फे ६४ लोकसेवा ऑनलाईन स्वरुपात नागरिकांना पुरविल्या जात आहेत. यामध्ये जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नव्याने कर आकारणी, अग्निशमन ना हरकत दाखला देणे आणि मलनिःसारण जोडणी देणे प्रमुख आहे. तसेच २८ सेवा आपले सरकार पोर्टल वर उपलब्ध आहेत. नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेवर सेवा देण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. बैठकीत सर्वप्रथम मनपा अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी संदीप देशमुख यांचे मनपाचा मानाचा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निर्भय जैन यांनी विशेष कार्य अधिकारी कांबळे आणि श्याम कापसे यांनी ओंकार यांचे स्वागत केले. या प्रसंगी मनपा अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles