यवतमाळ :- दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत चोरट्यांनी यवतमाळातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य केले. रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्यांची एकापाठोपाठ सात घरे फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला. बुधवारी (११ नोव्हेंबर) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. एकाच परिसरात सात घरफोड्या झाल्याने कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुलूप तोडून घरांमध्ये प्रवेश
शासकीय रुग्णालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. दिवाळीनिमित्त अनेक कर्मचारी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी बंद घरांची कुलपे तोडून आत प्रवेश केला. दीपा जाधव, कुळसंगे, मस्के, सातपुते, महिमा पवार, कावलकर आणि आकाश गेडाम यांच्या निवासस्थानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. घरातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. बुधवारी सकाळी काही कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा चोरट्यांकडून फायदा
सणासुदीच्या काळात अनेक कुटुंबे गावी किंवा नातेवाइकांकडे जातात. त्यामुळे बंद घरांना चोरटे लक्ष्य करत असल्याच्या घटना वारंवार समोर येतात. यंदाही दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांनी घरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. शासकीय रुग्णालयाच्या परिसरातच सात घरफोड्या झाल्याने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेडामनगरमध्ये शाळेचे कार्यालय फोडले
दरम्यान, गेडामनगर परिसरातील नगर परिषद शाळा क्रमांक १८ च्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा हजार ५०० रुपये किमतीचे दोन गंज चोरून नेले. याप्रकरणी पद्मा घोंगळे यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिवाळीच्या काळात घरांसह शैक्षणिक संस्थांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






