spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हिंगणघाटमध्ये महावितरणच्या ‘ग्राहक समाधान शिबिरा’ला उदंड प्रतिसाद; 138 तक्रारींचा जागेवरच निपटारा!

हिंगणघाट :- महावितरणतर्फे हिंगणघाट विभागात आयोजित ‘ग्राहक समाधान शिबिराला’ वीज ग्राहकांचा अभूतपूर्व आणि अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या विशेष शिबिरामध्ये वीज ग्राहकांच्या विविध अडचणींचे जागेवरच तात्काळ व पारदर्शक पद्धतीने समाधान करण्यात आले. विभागात प्राप्त झालेल्या एकूण 1810 तक्रारींपैकी तब्बल 138तक्रारींचे ऑन-द-स्पॉट यशस्वी निवारण करून ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला, तर उर्वरित 42 तक्रारी देखील पुढील सात दिवसांच्या आत प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही महावितरणने दिली आहे.

वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांच्या मार्गदर्शनात आणि हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदिप घोरूडे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विभागांतर्गत येणाऱ्या अलीपूर, मानकापूर, धोची, शेगाव कुंड, कारंजा चौक, नंदुरी चौक, बस स्टॅन्ड चौक, समुद्रपूर, गिरड, कोरा, कोंढाळी आणि मांडगाव या सर्व प्रमुख शाखा कार्यालयांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरादरम्यान वीजबिलांमधील दुरुस्ती, अचूकता, तांत्रिक अडचणी, नवीन वीज जोडणी, नावात व पत्त्यात बदल, सरासरी बिलांचे निरसन तसेच मीटर बदलणे यांसारख्या ग्राहकांच्या समस्यांचा वरिष्ठ अधिकारी व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्वरित निपटारा करण्यात आला. यासोबतच ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’, ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजना’ यांसारख्या विविध कल्याणकारी सरकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले.

विशेष म्हणजे, या शिबिरामध्ये ग्राहकांच्या मनातील ‘स्मार्ट मीटर’बाबतचे गैरसमज व शंका दूर करण्यावर भर देण्यात आला. स्मार्ट मीटरची कार्यप्रणाली, अचूक मीटर रीडिंग, दिवसाच्या वीज वापरावर मिळणारी प्रति युनिट 85 पैशांची सवलत, मोबाईल ॲपद्वारे मिळणारी रिअल-टाईम वीज वापराची नोंद आणि करंट लिकेजची अचूक माहिती यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे स्मार्ट मीटर अत्यंत पारदर्शक व फायदेशीर कसे आहे, हे अधिकाऱ्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले. यामुळे ग्राहकांमधील संभ्रम पूर्णपणे दूर झाला. महावितरणच्या या ग्राहककेंद्री उपक्रमामुळे वेळ व श्रमाची बचत झाल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी या शिबिराचे उत्स्फूर्त कौतुक केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.