भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कामगारांचा भाजपात प्रवेश

0
23

– भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई :- भारतीय कामगार सेनेच्या सहार कार्गो येथील आयात निर्यात विभागाचे अध्यक्ष विजय गोसावी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगारांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे, भाजपा प्रदेश कामगार आघाडीचे गणेश ताठे, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, आजवर केंद्रीय आणि राज्याच्या वेगवेगळ्या कामगार कायद्यांमुळे कामगारांना न्याय मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे कामगार कायद्यात एकसूत्रता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. कामगार क्षेत्रातील संघटनांमध्ये समन्वय नाही. संघटना स्वत:च्या स्वार्थासाठी भांडत असल्याने कामगारांचा विचार होत नव्हता. कामगारांचे भले व्हायचे असेल तर कामगारांनी एका छत्राखाली आले पाहिजे. भाजपा हा कामगार – शेतकरी, कष्टकरी अशा प्रत्येक घटकाला कसा न्याय देऊ शकतो याचाच प्राधान्याने विचार करणारा पक्ष आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. भाजपात तुमचे नुकसान कधीच होणार नाही. ही कामगारांच्या हितासाठी लढणारी संघटना आहे. कामगारांच्या मागे उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे, अशी ग्वाहीही यावेळी चव्हाण यांनी दिली.

किमान वेतनापासून पगार वाढीपर्यंतच्या कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करत आहे. 2017 पासून पगारवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. पदाधिकाऱ्यांसह कामगारांनी भाजपामध्ये प्रवेश करू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणला जात होता. मात्र त्या दबावाला बळी न पडता सारेजण भाजपात सहभागी झाल्याचे सुहास माटे यांनी यावेळी सांगितले.

श्रीकांत घाग, दीपक वाघ, दान बहाद्दूर यादव, साई प्रसाद मोरजकर, नवनाथ जाधव, गिलबर्ट जोसेफ, सुरेश पाटील, अख्तर शेख, अभिजित मुंडे, योगेश चव्हाण यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

यावेळी संजय निकम यांच्या उपस्थितीत मयूर टकले यांच्यासह महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट, सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.