– ‘जय जय रामकृष्ण हरी!.’ च्या गजरात रंगला मनपाचा महापौर कीर्तन महोत्सव
ह.भ.प. सोपान कानेरकर महाराज यांच्या जाज्वल्य वाणीतून हरिनामाचा जागर
नागपूर :- संतांची व सज्जनांची संगत लाभल्यास दैवाशी संवाद साधल्याशिवाय राहणार नाही, असे मार्गदर्शन ह.भ.प. सोपानदादा कानेरकर महाराज यांनी केले. निमित्त होते ते वैकुंठ चतुर्दशीचे औचित्य साधून मनपाद्वारे आयोजित महापौर कीर्तन महोत्सवाचे. ‘जय जय रामकृष्ण हरी!..’च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात महापौर कीर्तन महोत्सव सोमवारी (ता. २३) उत्साहात पार पडला. महोत्सवात ह.भ.प. सोपानदादा कानेरकर महाराज यांनी आपल्या जाज्वल्य वाणीतून हरिनामाचा जागर करीत उपस्थितांना भक्तिरसात चिंब केले.
कार्यक्रमाला दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, जलप्रदाय विशेष समिती सभापती दिव्या धुरडे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापती रूपाली ठाकूर, नेहरूनगर झोन सभापती सीमा ढोमणे, हनुमाननगर झोन सभापती ज्योती देवधर, शिवसेना गटनेते गणेश चार्लेवार, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते किशोर कुमेरिया, गटनेते शकील पटेल, नगरसेवक विजय (पिंटू) झलके, चंद्रकांत खंगार, शेषराव गोतमारे, मनोज साबळे, नगरसेविका मानसी शिमले, वैशाली उदापूरकर, मंगला मस्के आणि मनपा क्रीडा अधिकारी डॉ.पियुष आंबुलकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर निता ठाकरे यांनी प्रास्ताविकातून नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने तरुण पिढीला सनातन संस्कृतीशी जोडण्यासाठी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांनी घेतलेल्या परिश्रमांचा उल्लेख करून त्यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार व्यक्त केले. विशेष म्हणजे, महोत्सवानिमित्त सकाळी रांगोळी स्पर्धा आणि सायंकाळी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार मोहन मते यांनी महापौर निता ठाकरे यांच्या पुढाकारातून दक्षिण नागपुरात वारकरी संप्रदायाला एकत्र आणण्याचे कार्य झाल्याचे सांगितले. क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांच्या सहभागातून आयोजित अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात जनजागृती आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन होते, दक्षिण नागपुरातील इतर नगरसेवकांनीही अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कीर्तनातून ह.भ.प. सोपानदादा कानेरकर महाराज यांनी संतसंगतीचे महत्त्व विशद केले. संतांच्या आणि भगवंतांच्या मार्गावर चालताना स्वार्थ व परमार्थ कसा साधावा, याचा अर्थ सांगणारा अभंग त्यांनी सादर केला. संतांची व सज्जनांची संगत लाभल्यास दैवाशी संवाद साधल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. संगतीमुळे भगवंताचे दैवी रूप अनुभवता येते, तर संतांच्या मार्गाने व शास्त्रानुसार आचरण केल्यास भौतिक जीवनालाही प्रासादिक स्वरूप प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले. ‘भारत माता की जय’चा जयघोष करण्याचे आवाहन करीत त्यांनी नागपूर महानगरपालिकेचा ‘धनवान, कुळवान आणि चरित्रवान’ असा उल्लेख करून महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले. संत तुकडोजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगांच्या माध्यमातूनही त्यांनी संत संगतीचे महत्त्व पटवून दिले.
*रांगोळी स्पर्धेत प्रेमा रेके प्रथम*
महोत्सवानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत प्रेमा रेके (सांकेतिक क्रमांक २७) यांनी प्रथम, आराध्या मांडवकर (२९) यांनी द्वितीय, तर अंकिता तेटे (४५) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्रोत्साहनपर पारितोषिके मयुरी वैरागडे (१२), वर्षा मेंढे (८), सपना भालेकर (१६),. स्वप्नील नवलाखे (४७), विद्यानी जिचकार (३०), सुजाता बोडखे (६७), युवांक्षी पराले (१९), पूजा चव्हाण (२२), मीनल कुबडे (३४) आणि श्रुतिका रोकडे (३) यांना प्रदान करण्यात आली
*दिंडी स्पर्धेत रमणा मारोती मंडळाने प्रथम
दिंडी स्पर्धेत रमणा मारोती मंडळाने प्रथम, तर जय गजानन मंडळ, सहकार नगर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. भजन स्पर्धेत चैतन्य भजन मंडळाने प्रथम, नारी शक्ती भजन मंडळाने द्वितीय, तर श्री शिवशक्ती भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.
*लाभली वाद्यवृन्दांची साथ
कीर्तनाला रोशन महाराज केवटे यांनी पखवाजाची साथ दिली. शुभम महाराज देहनकर, उज्ज्वल महाराज उरकडे, कुणाल महाराज पांडे आणि आदित्य महाराज वाशिमकर यांनी गायन केले, तर रुद्र महाराज तिजारे आणि अर्षित महाराज अलवारे यांनी टाळकरी म्हणून साथसंगत केली. महोत्सवाला वारकरी संप्रदायासह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.






