हिंमत असेल तर मोटेगावकर प्रकरणात काँग्रेसला जाब विचारा

0
41

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे संजय राऊत यांना आव्हान

मुंबई :- नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांचे नव्हे तर संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पेपरफुटीचे जे काही अड्डे होते त्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे काम महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने केल्याने या प्रकरणात कुठेही मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री आपली जबाबदारी झटकत नाहीत तर आरोपींवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली जात आहे. तुम्ही मात्र निराशेच्या गर्तेत गेलात आणि वैफल्यग्रस्त झालात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर मोटेगावकर प्रकरणात राहुल गांधींना जाब विचारा, असे आव्हान भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी दिले.

नीट परीक्षा सुरळीत व्हावी म्हणून काही केंद्रीय यंत्रणांची मदत घेतली असेल तर संजय राऊत तुमचा पोटशूळ का उठतोय? कारण तुम्हाला माहिती आहे, या प्रकरणात काँग्रेसनेच महाराष्ट्रात पेपर फोडला. काँग्रेसचे लागेबांधे असलेला शिवराज मोटेगावकर आज तुरुंगात आहे, सीबीआयच्या ताब्यात आहे. तुम्ही याबद्दल काँग्रेसला चकार शब्दाने विचारत नाही. आधी त्याबाबत राहुल गांधींना जाब विचारा आणि मगच भाजपावर टीका करा. भाजपाचा आणि या पेपरफुटीचा काहीही संबंध नाही, असे बन यांनी ठणकावून सांगितले.

यांचा पक्ष संपणार, त्यांचा पक्ष बुडणार, यांचा पक्ष भाजपात विलीन होणार ही भविष्यवाणी संजय राऊत यांनी बंद केली पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेने तुमचा पक्ष संपवला आहे, त्याकडे आधी लक्ष द्या. राहुल गांधींकडून तुम्ही सुपारी घेतली आहे का? की येणाऱ्या काळात उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे? त्यामुळे काँग्रेसमध्ये उबाठा गट विलीन करण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत, हे ही महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना चालवण्यासाठी समर्थ आहेत. येत्या काळात उबाठा गट काँग्रेसमध्ये कशापद्धतीने नेता येईल, यासाठी जी रणनीती तुम्ही आखली आहे त्याकडेच तुम्ही लक्ष द्या, असेही बन यांनी सुनावले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत आपले अस्तित्व संपलेले आहे हे संजय राऊतांनी मान्य केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करीत बन पुढे म्हणाले, ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेने महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला भोपळा दिला आहे तो भोपळा हाती घेऊन काही होणार नाही. संजय राऊत यांनी हर्षवर्धन सपकाळांनाही सांगावे की आपल्याला भोपळा मिळाला आहे आणि हा भोपळा स्वीकारण्याची तयारी ठेवा. काँग्रेसची आणि तुमचीही खुमखुमी जिरलेली आहे. आता संजय राऊतांनी मान्य केले आहे की त्यांना पुढच्या निवडणुकीची तयारी केली पाहिजे. सध्या कोणतीही निवडणूक लढली नाही पाहिजे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, ज्या पद्धतीने वेगवेगळे पक्ष संपलेत अशी भविष्यवाणी करत आहात त्यामुळे तुमची अवस्था मात्र अतिशय वाईट होईल आणि तुमचा संपूर्ण पक्ष लयाला जाईल किंवा काँग्रेसमध्ये विलीन होईल, असे आसूड बन यांनी ओढले.