नागपूर :- नवरात्री उत्सवाच्या अनुषंगाने शहरात श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे आगमन झाल्यानंतर विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडा रिंग रोड, पोलीस लाईन टाकळी आणि कोराडी येथे विशेष कृत्रिम जलकुंड उभारण्यात आले आहेत. शहरातील विविध कृत्रिम तलाव व जलकुंडांमध्ये गुरुवारी (ता.२२) रोजी भक्तांनी श्री दुर्गा देवींच्या मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. बाराव्या दिवशी विविध ठिकाणी एकूण २७५ श्री दुर्गा देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तीन दिवसता एकूण ९०२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
महापौर निता ठाकरे व मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात घट विसर्जन व मूर्ती विसर्जन व्यवस्था करण्यात आली. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कृत्रिम तलावांमध्ये क्रेनची व्यवस्था करून विसर्जनासाठी मदत केली.
झोननिहाय विसर्जन:
लक्ष्मीनगर झोनमध्ये १ कृत्रिम तलाव उभारण्यात आला असून, येथे २२ श्री दुर्गा देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धंतोली झोनमध्ये १ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून, ७ मूर्तींचे विसर्जन झाले. याशिवाय पोलीस लाईन टाकळी येथील कृत्रिम जलकुंडात ७२, गोरेवाडा रिंग रोड जलकुंडात १०९ आणि कोराडी जलकुंडात ६५ श्री दुर्गा देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. अशा प्रकारे शहरातील मनपाद्वारे उभारण्यात आलेल्या विविध कृत्रिम जलकुंडात एकूण २७५ श्री दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन भक्तिभावाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले .








