संदीप कांबळे, कामठी :- विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांना जोडणारा पवित्र संस्कार मानला जातो. आयुष्यभर सुख-दुःखात साथ देण्याच्या वचनांवर उभे राहणारे हे नाते आज बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. अनुरूप जोडीदाराचा अभाव, परस्पर संवादातील दरी, वाढत्या अपेक्षा, आर्थिक ताणतणाव आणि आधुनिक जीवनशैलीच्या प्रभावामुळे कामठी तालुक्यात नवविवाहितांसह अनेक विवाहित जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
शिक्षण, करिअर आणि स्वावलंबनामुळे विवाहाचे वय वाढले असले, तरी त्यासोबत अपेक्षांचाही आलेख उंचावला आहे. प्रेमविवाह असो किंवा ठरवून झालेला विवाह, वैचारिक मतभेद, संशय, मानसिक व शारीरिक छळ, हुंड्याची मागणी, आर्थिक अडचणी तसेच कौटुंबिक हस्तक्षेप यांसारख्या कारणांमुळे अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. क्षुल्लक वाद वेळेत मिटविले गेले नाहीत तर ते पुढे गंभीर संघर्षाचे रूप धारण करून अखेरीस घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येते.
यामध्ये सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, ‘परफेक्ट रिलेशनशिप’ची अवास्तव कल्पना आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी अपुरा वेळ हीदेखील महत्त्वाची कारणे ठरत आहेत. संयम, विश्वास आणि संवादाऐवजी अहंकार व गैरसमज वाढत असल्याने अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत.
मात्र या परिस्थितीत आशेचा किरण म्हणजे वरिष्ठांची मध्यस्थी व योग्य समुपदेशन. वेळीच झालेल्या समुपदेशनामुळे व मध्यस्थीतीमुळे विवाहित जोडप्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात केल्याची सकारात्मक उदाहरणे समोर आली आहेत. योग्य मार्गदर्शन, संयमी संवाद आणि परस्पर समजूत यामुळे तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेली अनेक नाती पुन्हा जुळत असल्याचे वास्तव आहे.
घटस्फोट हा प्रत्येक समस्येचा अंतिम उपाय नसून, विवाहपूर्व समुपदेशन, परस्पर संवाद, विश्वास, संयम आणि एकमेकांच्या भावनांचा आदर या मूल्यांवर नात्यांची भक्कम पायाभरणी होते. मजबूत वैवाहिक जीवनाचा पाया प्रेमाइतकाच समजूतदारपणा, सहनशीलता आणि एकमेकांना स्वीकारण्याच्या वृत्तीवर अवलंबून असतो. त्यामुळे कोणताही टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी नातेवाईकांनी मध्यस्थी व समुपदेशनाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे मत सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.




