Home Latest News वॉशिंग मशीनवरील वादातून अमेरिकेत भारतीयाचा मृत्यू; पत्नी व मुला समोर हल्ला

वॉशिंग मशीनवरील वादातून अमेरिकेत भारतीयाचा मृत्यू; पत्नी व मुला समोर हल्ला

0
64

 

नवी दिल्ली १२ : अमेरिकेतील टेक्सासमध्ये वॉशिंग मशीनमुळे झालेल्या वादातून एका भारतीय नागरिकाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव चंद्रमौली उर्फ बॉब नागमल्लईया असून ते ५० वर्षांचे होते आणि मूळचे कर्नाटकचे होते. बुधवारी सकाळी टेक्सासमधील एका मोटेलमध्ये त्यांच्या सहकर्मचाऱ्याशी झालेल्या वादामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना चंद्रमौलींच्या पत्नी आणि १८ वर्षांच्या मुलासमोर घडली.

डेलास पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रमौली टेक्सासमधील एका मोटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. घटना घडली तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलगा मोटेलमध्ये उपस्थित होते. वॉशिंग मशीनमुळे झालेल्या तांत्रिक अडचणींवरून चंद्रमौलींचा सहकर्मचारी यॉर्दनिस कोबोस मार्टिनेझ यांच्यासोबत वाद झाला. चंद्रमौली दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने यॉर्दनिसला त्यांचे म्हणणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण यॉर्दनिसचा राग इतका वाढला की त्याने बाजूला ठेवलेला मोठा सुरा उचलून चंद्रमौलींवर हल्ला केला.

चंद्रमौलींनी सुटकेसाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला, आणि मोटेलमध्ये पत्नी व मुलाजवळ पोहोचले. मात्र, रागात असलेला यॉर्दनिस त्यांच्यापाठोपाठ धावला आणि पत्नी व मुलाच्या अडथळ्याचा विरोध न करता चंद्रमौलींवर सुऱ्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की यॉर्दनिसच्या मागील रेकॉर्डमध्ये गाड्यांची चोरी आणि हिंसक हल्ले यांसारखे गुन्हे आहेत. बुधवारीच्या घटनेनंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात दोष सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप किंवा फाशी होऊ शकते.

चंद्रमौली यांच्या हत्या प्रकरणाची होस्टनमधील भारतीय दूतावासाने दखल घेतली आहे. कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडियाने सोशल मीडियावर पोस्टद्वारे स्पष्ट केले की, “चंद्रमौली यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. आम्ही त्यांच्या संपर्कात असून शक्य ती सर्व मदत करत आहोत. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत.”