Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बॅग लिफ्टिंग आणि चेन स्नॅचिंग करणारी आंतरराज्यीय टोळी उघड

– भंडारा पोलिसांनी मध्यप्रदेशात टाकली धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

– तुमसर आणि साकोलीतील चोऱ्यांचा छडा; 

भंडारा :- गेल्या दोन-तीन महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या आंतरराज्यीय बॅग लिफ्टिंग आणि चेन स्नॅचिंग टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि तुमसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ‘कडिया सांसी’ या अतिसंवेदनशील गावातून टोळीच्या मुख्य म्होरक्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली.

तुमसर येथील बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक परिसर, तसेच साकोली येथे दिवसाढवळ्या बॅग लिफ्टिंगच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी तपासाचे आदेश दिले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून ही टोळी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विवेक सोनवणे आणि तुमसरचे पोउपनि प्रवीण सयाम यांच्या पथकाने मध्य प्रदेशात धाव घेतली. आरोपींचे गाव गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अतिसंवेदनशील असल्याने, पथकाने स्थानिक बोडा पोलिसांच्या मदतीने नियोजनबद्ध सापळा रचला. तब्बल ४ दिवस तिथे तळ ठोकल्यानंतर अमन जितमल सिसोदिया (२४) याला ताब्यात घेण्यात आले.

अमन सिसोदिया याने तुमसर आणि साकोलीतील ३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. धक्कादायक म्हणजे, या टोळीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश अशा पाच राज्यांत अनेक चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ४२ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी, असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई एलसीबीचे निरीक्षक नितीन चिंचोळकर, तुमसरचे निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक सोनवणे, प्रवीण सयाम, चेतन पोटे, नामदेव बडदे आणि राजकुमार गिऱ्हेपुंजे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे आंतरराज्यीय टोळीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.