जळगाव ११ : भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना, जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गुढे येथील जवान स्वप्निल सुभाष पाटील यांना वीरमरण आले आहे. सीमेवर फ्लड लाईटची दुरुस्ती करत असताना विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेची बातमी गुढे गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या भूमिपुत्राच्या निधनामुळे गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
वीर जवान स्वप्निल पाटील यांचे पार्थिव पश्चिम बंगालमधून विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणले जाणार आहे. त्यानंतर, लष्कराच्या विशेष वाहनाने ते त्यांच्या मूळ गावी गुढे येथे आणले जाईल, जिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.








