spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर महामार्गावर माणुसकीला काळीमा: पत्नीचा मृतदेह बाईकवर बांधून नेण्याची वेळ

नागपूर ११ : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पतीने मदतीसाठी केलेल्या आवाहनाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हतबल पतीने शेवटी आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले?

१० ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी ही दुर्दैवी घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात घडली. मध्यप्रदेशातील सिवनी येथील रहिवासी असलेले अमित यादव आणि त्यांची पत्नी ग्यारसी (वय ४०) हे रक्षाबंधनासाठी कोराडीजवळील लोणारा येथून करणपूरला जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ग्यारसी रस्त्यावर पडल्या आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर अमित यादव मदतीसाठी अनेक वाहनांना थांबवण्यासाठी हात जोडत होते, पण कोणीही थांबले नाही. “माझ्या पत्नीचा मृत्यू झाला होता, पण माणुसकी दाखवायला कोणीही तयार नव्हते,” असे त्यांनी व्यथित होऊन सांगितले.

जेव्हा कोणतीच मदत मिळाली नाही, तेव्हा अमित यांनी हताश होऊन पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधला आणि तो आपल्या मूळ गावी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हे हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला थांबवले आणि ग्यारसी यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. या घटनेने समाजातील असंवेदनशीलतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Popular Articles