मुंबई :- राज्यात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी जनजागृती, वेळेवर उपचार, अँटी स्नेक व्हेनमची उपलब्धता आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.
सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य श्वेता महाले, बाबासाहेब देशमुख, अर्जुन खोतकर, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री आबिटकर म्हणाले की, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अँटी स्नेक व्हेनमची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामपंचायत स्तरापर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सर्पदंशानंतर भीतीमुळेही अनेकदा गंभीर परिणाम होतात. त्यामुळे रुग्णांनी ‘गोल्डन अवर्स’मध्ये रुग्णालयात पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असून याबाबत व्यापक जनजागृती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सर्पदंशाला अधिसूचित (नोटिफाईड) आजारांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत विधि व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या राज्यात अँटी स्नेक व्हेनमचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. कुठे त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. सर्पदंश विषारी आहे की नाही हे अल्पावधीत ओळखण्यासाठी ‘अँटी स्नेक व्हेनम किट’ उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे किट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वितरित करण्यात येत आहेत. त्यामुळे उपचाराची दिशा त्वरित निश्चित होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
मंत्री आबिटकर यांनी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामपंचायतींमध्ये जनजागृतीची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक असून त्यात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. तसेच पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येणार असून आवश्यक तेथे अतिदक्षता उपचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाशी समन्वय साधला जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्पदंश प्रतिबंध, उपचार व संशोधन व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी शासन सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.




