– जनशक्ती मंचाने शासनाला उपस्थित केला प्रश्न ?
नागपूर :- रात्रपाळीत काम करणारे, नोकरदार वर्ग आणि सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना भटक्या श्वानांचा होत असलेला त्रास आता जीवघेणा बनला आहे. यावर प्रशासनाकडे उत्तर आहे किंवा नाही यासंदर्भात जनशक्ती मंचने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर तातडीने तोडगा काढा अशीच भूमिका जनशक्ती मंचने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. मुन्ना महाजन, माजी आमदार दिनानाथ पडोळे, हेमंत गडकरी, भगवानदास राठी, किशोर कमलाकर, सिद्धू कोमजवार, निखिल भुते व दिलीप नरवडीया यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थित राहून यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. कोरोना काळात प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व प्रकषनि जाणवले. परिणामी बहुतांश लोकांनी सकाळी फिरायला जाणे सुरू केले आहे. या सर्व पहाटपक्षींना भटक्या श्वानांचा प्रचंड त्रास होतो. हे श्वान कुठल्याही क्षणी येतात अन् हल्ला करून निघून जातात. पूर्वी श्वान माणूस दिसल्यावर पळून जायचे. आता तर ते न घाबरता लोकांवरच तुटून पडतात. यामुळे श्वानांचा हल्ला हा नित्याचाच प्रकार झाला आहे. रोज मरे त्याकरिता कोण रडे अशी अवस्था भटक्या श्वानांच्या समस्येबाबत घडू नये यावर मुन्ना महाजन यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अनेकांना आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी रात्रपाळीत काम करावे लागते. ते कर्मचारी रात्रीला घरी जातात तेव्हा त्यांच्या दुचाकीवर बेवारस श्वान हल्ले करून त्यांना जायबंदी करतात. आता रात्रपाळीत काम करणे अनेकांसाठी रक्तदाब वाढविणारे ठरले आहे. पोषक वातावरण आणि भूतदयेच्या नावाखाली भटक्या श्वानांना अन्नपदार्थ खाऊ घालणारे वाढत आहे. त्याचाही फटका लोकांना बसत आहे. यावर रामबाण तोडगा काढत पीडितांना दिलासा द्यावा, अशी विनंती व मागणी हेमंत गडकरी यांनी केली.




