– CEIR पोर्टलच्या साहाय्याने शोध; भंडारा पोलीस दलाची कार्यवाही
हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधून काढले असून, ते संबंधित मालकांना परत करण्यात आले आहेत. CEIR पोर्टलच्या साहाय्याने शोध घेण्यात आलेले विविध कंपन्यांचे मोबाईल जवाहरनगर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात मालकांना सुपूर्द करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल हरविल्यानंतर संबंधित नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती, तसेच CEIR पोर्टलवरही नोंदणी केली होती. या तक्रारींची दखल घेऊन जवाहरनगर पोलिसांनी पोर्टलच्या माध्यमातून हरविलेल्या मोबाईलचा तांत्रिक शोध घेतला. या शोध मोहिमेत ट्रेस झालेले मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी तेजस सारडा आणि पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या हस्ते जवाहरनगर पोलीस ठाण्यातील ५ मोबाईल धारकांना परत करण्यात आले.
पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील व पोलीस निरीक्षक सतीश बनसोड यांच्या सायबर पथकाने ही कार्यवाही केली. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
दरम्यान, नागरिकांनी आपला मोबाईल हरविल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि www.ceir.gov.in या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन भंडारा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. यामुळे तांत्रिक साहाय्याने मोबाईलचा शोध घेणे सोपे होईल, असे पोलिसांनी सांगितले








