spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठी नगर परिषदेची धडक कारवाई

– मागील आठ दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहिमेचा सपाटा; स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन पथक लवकरच कार्यान्वित

कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीतील वाढत्या अतिक्रमणामुळे शहराच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने नगर परिषद प्रशासनाने शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्याधिकारी विनोद जाधव आणि नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मागील आठ दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहिमेचा धडाका सुरू असून ही कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.

15 जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत रमानगर आरओबी पुलिया परिसरातील नाल्यांवरील तसेच रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या पक्क्या अतिक्रमित बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर जयस्तंभ चौक ते गांधी चौक आणि शुक्रवारी बाजार चौक परिसरातही अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

नगर परिषदेकडून लवकरच स्वतंत्र अतिक्रमण निर्मूलन पथक कार्यान्वित करण्यात येणार असून अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, शुक्रवारी बाजार परिसरातील काही अस्थायी दुकानांचे पक्के बांधकाम तोडण्यात आले. या पार्श्वभूमीवर काही दुकानधारकांची दिशाभूल करून नगर परिषद प्रशासनाच्या नावाने लाखो रुपयांत दुकाने विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी अशा प्रकारची कोणतीही दुकाने नगर परिषदेकडून विकण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. शासकीय जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या संबंधितांचा शोध सुरू असून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्याधिकारी विनोद जाधव आणि नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी नागरिकांना आवाहन करत, शासकीय जागेवरील शेड, अस्थायी दुकाने, टिनचे टपरे, पानठेले तसेच रस्त्याला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण तात्काळ स्वखुशीने हटवावे, अन्यथा नगर परिषदेकडून कारवाई करण्यात येईल आणि त्यास संबंधित नागरिक स्वतः जबाबदार राहतील, असा इशारा दिला.

ही कारवाई मुख्याधिकारी विनोद जाधव आणि नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकातील प्रदीप भोकरे, गौरव शर्मा आणि शुभम टाकभवरे यांनी यशस्वीपणे पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.