– हृदय शस्त्रक्रियेसाठी तातडीने मदत
नागपूर :- दृदय विकाराचा झटका आलेल्या एका शेतकऱ्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने वेळीच मदत करून साह्य केल्याने त्या रुग्णाचे प्राण वाचू शकले. विनोद विठ्ठलराव भुडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
५३ वर्षीय विनोद भुडे हे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बेसूर येथील रहिवासी आहेत. शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय. जेमतेम आर्थिक उत्पन्नावर ते कुटुंबाचा गाढा ओढतात. दररोज शेतीत कष्ट करणाऱ्या विनोद यांना गेल्या वीस वर्षांपासून मधुमेह आहे आणि त्यांच्या कुटुंबात हृदय विकाराची अनुवांशिकता आहे. काही दिवसांपूर्वी रात्री जेवण झाल्यानंतर ते झोपले असता अचानक त्यांना घाम येऊन छातीत दुखायला लागले. त्यामुळे मुलगा त्यांना उमरेड येथील दवाखान्यात घेऊन गेला. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.
तपासणीअंती हृदयाच्या रक्त वाहिन्यांमध्ये पाच ब्लॉकेजेस आढळले. शस्त्रक्रिया आवश्यक होती, पण पैशाचा प्रश्न होता. रुग्णालयात इतरांकडून त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीविषयी माहिती मिळाली. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे जमवून त्यांच्या मुलाने हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय निधीकडे अर्ज सादर केला. उपचारांची तातडी बघता या कार्यालयाने तातडीने सर्व कार्यवाही करून त्यांना १ लाख रुपयांची मदत तातडीने करण्यात आली त्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया होऊ शकली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामुळेच माझे प्राण वाचू शकले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी मनापासून आभारी असल्याची भावना भुडे यांनी व्यक्त केली.
गरजू रुग्णांना आवश्यक कागदपत्रांची पूतर्ता केल्यावर कमीत कमी वेळात कशी मदत करता येईल यादृष्टीने असा आमचा प्रयत्न राहात असल्याचे मुख्यमंत्री सहायता निधी, विदर्भ व नागपूर विभागाचे सदस्य सचिव तथा विशेष कक्ष अधिकारी डॉ. सागर पांडे यांनी सांगितले.




