spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शेतकरी राजेंद्र सपाटे आत्महत्या प्रकरण: पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर ३०६ अन्वये गुन्हा दाखल करा!

– संवेदना हरपलेल्या पालकमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; शिवसेना (उबाठा) ची पत्रकार परिषदेतून आक्रमक मागणी

हंसराज, भंडारा :- मोहाडी तालुक्यातील धोप येथील कर्जबाजारी शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि संबंधित बेजबाबदार अधिकारीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. याप्रकरणी पालकमंत्री व दोषी अधिकाऱ्यांवर भादंवि कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

अश्रू ढाळून विनवणी करूनही मंत्र्यांनी फिरवली पाठ

पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना संजय रेहपाडे म्हणाले की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील केवळ तीनच (भंडारा, पवनी, लाखांदूर) तालुक्यांचा समावेश केला. उर्वरित मोहाडी, तुमसर, लाखनी आणि साकोली तालुक्यांतही भीषण दुष्काळी परिस्थिती असताना या तालुक्यांना वगळण्यात आले.

या पार्श्वभूमीवर आठवड्याभरापूर्वी पालकमंत्री पंकज भोयर हे मोहाडी तालुक्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शेतकरी राजेंद्र सपाटे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन नहराची दुरवस्था आणि शेतीचे नुकसान डोळ्यांसमोर मांडत आपल्या बांधावर येण्याची हात जोडून रडत-रडत विनवणी केली होती. मात्र, पालकमंत्र्यांनी या शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचे सौजन्य तर दाखवलेच नाही, शिवाय संबंधित अधिकाऱ्यांना साधा फोनही केला नाही. प्रशासकीय अनास्था आणि पालकमंत्र्यांच्या या टोकाच्या दुर्लक्षामुळे प्रचंड खचलेल्या राजेंद्र सपाटे यांनी अखेर शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली, असा आरोप रेहपाडे यांनी केला.

पालकमंत्र्यांचा हा दौरा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी होता की केवळ देखावा आणि स्टंटबाजीसाठी? असा सवाल उपस्थित करत रेहपाडे म्हणाले की, महायुती सरकार पूर्णतः शेतकरीविरोधी असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पालकमंत्र्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. अशा असंवेदनशील मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत असून, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ भोयर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, शहरप्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:

🔹शेतकरी आत्महत्या प्रकरणी पालकमंत्री पंकज भोयर व संबंधित अधिकाऱ्यांवर भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करावा.

🔹 बेजबाबदार व असंवेदनशील पालकमंत्र्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा.

🔹 शेतकऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे.

🔹मयत शेतकरी राजेंद्र सपाटे यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांचे तातडीचे आर्थिक साहाय्य द्यावे आणि त्यांच्या मुलाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

Popular Articles