– २ तास वीज, तीही अनियमित; संतप्त शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी
हंसराज,भंडारा मोहाडी :- मोहाडी तालुक्यातील हिवरा-वसेरा परिसरामध्ये गेल्या सहा दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून ऐन हंगामात धानाचे (भात) पीक धोक्यात आले आहे. शेतात पाणी देण्यासाठी विजेची अत्यंत गरज असताना महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. २४ तासांतून जेमतेम दोन तास वीज दिली जाते, तीही इतकी अनियमित व कमी दाबाची असते की पाण्याच्या मोटारी सुरूच होत नाहीत. यामुळे उभे धानाचे पीक डोळ्यादेखत सुकून चालले असून हताश झालेल्या शेतकऱ्यांवर अक्षरशः आत्महत्येची पाळी आली आहे.
पाण्याअभावी धानाचे पीक सुकले
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून धानाच्या पिकाला नियमित पाण्याची आवश्यकता आहे. बोअरवेल आणि विहिरींमध्ये मुबलक पाणी असूनही केवळ विजेअभावी शेतात पाणी पोहोचू शकत नाही. हजारो रुपयांचे खत, बियाणे आणि अहोरात्र घेतलेली मेहनत डोळ्यादेखत जळून खाक होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. “आम्ही जगायचे कसे आणि शेती तरी कोणत्या पद्धतीने करायची?” असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
प्रशासनाच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप उसळला आहे. शेतीसाठी स्वतंत्र वीज कनेक्शनची मागणी गावातील भारनियमन आणि तांत्रिक दोषांचा थेट फटका शेतीपंपांना बसत आहे. त्यामुळे शेतीसाठी स्वतंत्र वीज कनेक्शन (फिडर) तात्काळ देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
“गेल्या सहा दिवसांपासून आमच्या हिवरा-वसेरा गावात वीज नाही. २४ तासांतून कशीबशी दोन तास वीज येते, पण त्यातही सतत बिघाड होतो. आमचे धानाचे पीक पाण्याअभावी पूर्णपणे करपून चालले आहे. महावितरणला फोन केला तर ते केवळ ‘फोन करून सांगतो’ अशी थापेबाजी करतात. जर वेळेवर वीज मिळाली नाही, तर माझ्यासारख्या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. सरकारने तातडीने स्वतंत्र कनेक्शन देऊन वीज सुरळीत करावी.”
— तुकडू मोडकू गलबले (शेतकरी, हिवरा-वसेरा)








