कामठी :- सामाजिक शांतता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याच्या दृष्टीने नवीन कामठी पोलीस स्टेशन ने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने परिसरातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे हटवण्यात आले असून, अधिकृत परवानगी असलेल्या ठिकाणी नियमावलीची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. नवीन कामठी पोलीस हद्दीतील ज्या धार्मिक स्थळांनी भोंग्यांसाठी रीतसर परवानगी घेतली नव्हती, असे अनधिकृत भोंगे पोलिसांनी स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आवाहनाला प्रतिसाद देत आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई करून हे भोंगे हटवण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलिसांनी स्पष्ट नियमावली जाहीर केली आहे.
भोंगे जमिनीपासून किमान १५ फूट उंचीवर असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आवाजाची तीव्रता मर्यादित ठेवण्यासाठी ठराविक ‘साऊंड सिस्टीम’ बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वाजवण्यास पूर्णतः बंदी असेल.
नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत
पोलिसांच्या या भूमिकेमुळे परिसरातील आवाजाच्या प्रदूषणावर नियंत्रण येणार असून, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडल्याबद्दल कामठी परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
“आम्ही शांतता समितीच्या बैठकीत सर्वांना विश्वासात घेतले आहे. नियमांचे पालन करणे हे सर्वांच्याच हिताचे असून ध्वनी प्रदूषण रोखणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”
— महेश आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , नवीन कामठी



