spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने कन्हान दुमदुमले

– माऊली मंडळ व मातोश्री मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी भक्तिमय उत्साहात

– शिवाजी नगर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन व फराळ प्रसाद वितरण

कन्हान :- आषाढी (देवशयनी) एकादशी निमित्त कन्हान शहरात माऊली मंडळ व मातोश्री मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. “जय हरी विठ्ठल… जय जय विठ्ठल” या अखंड जयघोषाने संपूर्ण शहर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

स्वामी विवेकानंद नगर येथील हनुमान मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करून श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या सार्वजनिक पालखीचे मोठ्या भक्तिभावात प्रस्थान झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या घोषात तसेच भजन-कीर्तनाच्या सुरेल वातावरणात पालखी शिवाजी नगर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहचली. पुजा अर्चना,भजन करुन पालखी पुढे मार्गांने नगरभ्रमण करुन महामार्गावरील श्री शिव पंचायत हनुमान मंदिर कन्हान येथे पोहचली. शहरातील विविध मार्गांनी नगर प्रदक्षिणा केली. मार्गभर भाविकांनी पालखीचे दर्शन घेत विठ्ठल नामाचा गजर करित उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. या भक्तिमय पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे अंशु शिवरकर यांनी भगवान श्री विठ्ठल तर जानवी राऊत हिने माता रुक्मिणी च्या वेषभुषेत सहभागी होऊन उपस्थित भक्तांचे लक्ष वेधुन घेतले.

पारंपरिक वेशभुषा आणि भक्तिमय वातावरणामुळे उपस्थितांनी छायाचित्रे काढत या सोहळ्याचा आनंद लुटला. नगर प्रदक्षिणे नंतर स्वामी विवेकानंद नगर येथील हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रमांनी पालखी सोहळ्याचा समारोप झाला. या भक्तिमय सोहळ्याला नगरसेविका रेखा टोहने, निती तेलोते, माजी नगरसेविका राखी परते, कल्पना जाधव, वनिता कावळे, सुषमा मस्के, वैशाली खंडार, माया, उषा साकोरे, ललिता शर्मा, मनिषा चिखले, रंजना भोयर, सुनिता वाडीभस्मे, वनिता खवले, सोनु सहगल, नलिनी यादव, वीणा हुड, उर्मिला तितरमारे, शीला सहगल, उषा बंड, सुमन शेंडे, संगिता सव्वालाखे, कुसुम मेहरकुळे, छाया साकोरे, वैशाली इंगोळकर, शारदा शिवरकर यांच्या सह परिसरातील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पालखी सोहळ्यामुळे कन्हानमध्ये वारकरी परंपरेचे दर्शन घडले.

शिवाजी नगर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन व फराळ प्रसाद वितरण

                शिवाजी नगर कन्हान येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिभावाने आयोजन करून पहाटे मंदिरात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा दूध व जलाभिषेक करून विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. यावेळी भाविकांनी विठ्ठल नामाचा गजर करत दर्शनाचा लाभ घेतला. यानंतर भजन मंडळ, शिवाजी नगर कन्हान यांनी हरिनामाचा गजर, भजन व कीर्तन करित टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलाच्या नाम स्मरणाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले. सायंकाळी ज्ञानेश्वर महाराज भजन मंडळ कामठी यांच्या भजन-कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात करण्यात आला. यामध्ये श्रीकांतजी भुताळ यांनी आपल्या ओज स्वी वाणीने विठ्ठल भक्तीचा महिमा सांगत उपस्थित भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले. भजन-कीर्तना नंतर सर्व भाविकांना फराळाच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला गीता भीलकर, भारती महल्ले, नंदा सोलंकी, मीरा तिडके, पुष्पा लाडेकर, गीता येवले, सुनीता मानकर, ज्योती उराडे यांच्यासह परिसरातील अनेक महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक कार्यक्रमांमुळे कन्हान शहर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणाने दुमदुमून गेले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.