हंसराज, प्रतिनिधी करडी :- स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभोरा शेत शिवारात एका आंब्याच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून एकूण ५९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली असून यामध्ये नागपूर जिल्ह्यासह स्थानिक चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांभोरा येथील शेत शिवारात काही इसम उघड्या जागेत ताशपत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची टीप पोलीस शिपाई काळसर्पे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता, ज्ञानेश्वर भदु मारबते (४६, रा. ढीवरवाडा), अजय भैय्याजी जाधव (२२, रा. घोराड, जि. नागपूर), नितीन शहादेव शेंडे (३६, रा. जांभोरा) आणि वशिष्ट धनराज राहांगडाले (४२, रा. जांभोरा) हे आरोपी रंगेहाथ जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून ताशपत्त्यांसह डावावरील १८३० रुपये हस्तगत केले. त्यानंतर आरोपींची अंगझडती घेतली असता, नितीन शेंडे याच्याकडे ३८ हजार रुपये रोख व १० हजारांचा मोबाईल (एकूण ४८ हजार), अजय जाधव याच्याकडे १५०० रुपये रोख व ६ हजारांचा मोबाईल (एकूण ७,५०० रुपये), ज्ञानेश्वर मारबते यांच्याकडे १००० रुपये आणि वशिष्ट राहांगडाले याच्याकडे १३०० रुपये रोख, असा एकूण ५९ हजार ६६० रुपयांचा ऐवज मिळून आला.




