– येरली मोहल्ला येथे ‘कॉर्नर मीटिंग’द्वारे नागरिकांशी साधला संवाद
हंसराज, भंडारा तुमसर :- आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठी, आज तुमसर शहरात पोलिसांच्या वतीने भव्य पथसंचलन (रूट मार्च) काढण्यात आले. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडले. अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे आणि ठाणेदार सुभाष बारसे यांच्या नेतृत्वाखालील या पथसंचलनात १४ पोलीस अधिकारी, ११४ अंमलदार आणि आरसीपी (RCP) पथक सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख आणि संवेदनशील मार्गांवरून हे संचलन काढण्यात आले.
पथसंचालनानंतर येरली मोहल्ला येथे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी नागरिकांसोबत ‘कॉर्नर मीटिंग’ घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी ईद-ए-मिलाद आणि इतर सण एकोप्याने व शांततेत साजरे करण्याचे, सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडण्याचे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असून, सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.





