spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलिस खात्याविषयी ज्ञान, बौद्धिक क्षमतेची होणार चाचणी

– देशभरातील पोलिस दलांचे संघ स्पर्धेत होणार सहभागी

– पोलिस, नागपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण

नागपूर :- परीक्षा उत्तीर्ण केली पोलिस अधिकारी, अंमलदार कवा शिपाई बनले की झाले, एवढेच पुरेसे नाही, तर अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस खात्याविषयी किती ज्ञान आहे, याचीही चाचपणी केली जाते. त्यांची बौद्धिक क्षमताही तपासली जाते. पोलिस खात्याविषयी असलेले ज्ञान वृद्धगत होत राहावे यासाठी पोलिस दलात विविध उपक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात.

शहरात 24 ते 29 नोव्हेंबरदरम्यान 69 वा अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा पार पडणार आहे. नागपुरात पहिल्यांदाच होणाऱ्या या मेळाव्यात देशभरातील पोलिस दलांचे संघ सहभागी होणार आहेत. पोलिस दलांना ज्ञान, कौशल्य, शिस्त आणि कार्यक्षमता प्रदर्शित करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

या स्पर्धेत तोंडी, लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. या माध्यमातून पोलिस दलांची तपास कौशल्ये, तांत्रिक ज्ञान, शिस्त, टीमवर्क आणि तणावपूर्ण परिस्थितीत कार्य करण्याची क्षमता वृद्धिंगत होणार आहे. वैज्ञानिक तपास तंत्रज्ञान, सायबर तपास, संगणक साक्षरता, फोटोग्राफी-व्हिडीओग्राफी, डॉग स्क्वॉड, बॉम्ब स्क्वॉड प्रात्यक्षिक, कमांडो स्पर्धा, नेमबाजी व पोलिस बँड यांचा या स्पर्धेत समावेश असतो.

या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांचे पोलिस खात्याविषयी असलेले ज्ञान तपासले जाते. असे म्हणतात की, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी घटनास्थळी तो एक तरी पुरावा सोडतो आणि घटनास्थळी एकदा तरी परत येतो. पोलिसांनी घटनास्थळी योग्य वेळात योग्य तपास केला, आवश्यक पुरावे गोळा केले तर एकही गुन्हेगार सुटू शकणार नाही. घटनास्थळावरील नमुने गोळा करताना, बोटांचे ठसे घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कोणते कौशल्य वापरले पाहिजे, किती वेळात गुन्हा उघडकीस आणता येऊ शकतो, बरेचदा पोलिसांची दिशाभूल केली जाते, आरोपी कुटुंबातीलच असतो, आरोपीच पोलिसांना मार्गदर्शन करतो, अशा वेळी तपास अधिकाऱ्याची परीक्षाच असते. अशी परिस्थिती कशी हाताळायची, यासाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे, हे या ठिकाणी तपासले जाते. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत कोणत्या राज्याचा संघ विजयी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली बैठक

यासंदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मिता शुक्ला, अपर पोलिस महासंचालक (सीआयडी) सुनील रामानंद उपस्थित होते. या बैठकीस पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल व इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यावेळी शुक्ला यांनी डॉ. सिंगल तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस मुख्यालय आणि हिंगणा मैदानाला भेट दिली. मेळाव्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. नागपूर जिल्ह्यातील विविध युनिट्सचे अधिकारी व कर्मचारी देखील या वेळी उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

Popular Articles