spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्याच्या नेहरू वार्डात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी; शिक्षणाचा वसा पुढे नेण्याचा मान्यवरांचा निर्धार

हंसराज प्रतिनिधी, भंडारा :-  महिला सक्षमीकरण आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज नेहरू वार्ड, भंडारा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या संघर्षाला उजाळा देत, महिलांनी शिक्षणाच्या प्रवाहात सक्रिय राहण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आदरांजली वाहून करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक शिवशंकर आजमले, आशा उके, रिता मेश्राम, अनुराधा माने, आयुषी बसेशंकर आणि सुनंदा बसेशंकर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी वार्डातील लहान मुला-मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीते, नृत्य आणि भाषणांचा समावेश होता. कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या बालकांना आयुषी बसेशंकर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे (पुस्तके आणि पेन) वाटप करण्यात आले. भविष्यातील पिढीला शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मुख्य अतिथींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. “सावित्रीबाईंनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची दारे महिलांसाठी खुली केली, त्यामुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण हेच प्रभावी शस्त्र असल्याचेही मान्यवरांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे यशस्वी संचालन कविता कृपाले, रेखा पाढक, सुनंदा ठाकरे, आरती सार्वे आणि माधुरी ओघारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती माते, वैशाली शहारे, हिना गाढवे, योगिता नेवारे, मताता नेवारे, हर्षा बावणे, कुंदा नांदूरकर, बबिता नेवारे, कल्पना राऊत, अंजू पाठक तसेच वार्डातील कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमाला नेहरू वार्डातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण परिसरात ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Popular Articles