spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर पोलिसांचा नॉयलॉन मांजा विक्रीवर मोठा दणका; ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

– एका आरोपीला अटक, दुसरा फरार; भारतीय न्याय संहितेसह पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

हंसराज प्रतिनिधी,भंडारा :- मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या नॉयलॉन मांजाची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध तुमसर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कटंगी नाका ते गोबरवाही रोडवर करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुमसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सयाम आणि त्यांचे पथक मौजा कटंगी नाका परिसरात गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद रित्या दुचाकीवरून जात असलेला आरोपी किशोर नारायण तुरकर (वय ४४, रा. नाकाडोंगरी) याला अडवून झडती घेतली असता, त्याच्याकडे मानवी जीवनास आणि पक्ष्यांना घातक असलेला प्रतिबंधित नॉयलॉन मांजा मिळून आला. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी शिवम जयस्वाल (रा. मुक्ताबाई शाळेजवळ, तुमसर) याने किशोर याला हा मांजा विक्रीसाठी प्रवृत्त केले होते.

पोलिसांनी या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

• १८ नग नॉयलॉन मांजा चक्र्या: ‘K COBRA GOLD’ लेबल असलेल्या एकूण ९,००० रुपये किमतीच्या १८ प्लास्टिक चक्री.

• दुचाकी: मांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली होंडा शाइन मोटारसायकल (क्र. MH-36 AH 5770), किंमत ६०,००० रुपये.

असा एकूण ६९,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

नॉयलॉन मांजावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पूर्णपणे बंदी घातली आहे. हा मांजा पर्यावरण, मानवी जीवन आणि पक्ष्यांच्या जिवासाठी अत्यंत धोकादायक आहे, याची जाणीव असूनही केवळ आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी आरोपी किशोर तुरकर आणि शिवम जयस्वाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३, २९२, ४९ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या कलम ५ आणि १५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी शिवम जयस्वाल सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. सयाम व त्यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.