spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवीन टाकळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

– महिलांनी अंधश्रद्धेला विरोध करून विज्ञानाची कास धरावी : नगरसेविका चंद्रकला भोपे यांचे आवाहन

हंसराज प्रतिनिधी, भंडारा :- शिक्षणाचे दीपस्तंभ आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी नवीन टाकळी येथील शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा तसेच हनुमान मंदिर परिसर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद भगतसिंग शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली नागुलवार होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून परिसरातील नगरसेविका चंद्रकला भोपे उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना शिक्षकांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. १८४८ मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा उघडून सावित्रीबाईंनी स्त्री-शिक्षणाचा पाया रचला आणि समाजाला नवी दिशा दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रमुख पाहुण्या नगरसेविका चंद्रकला भोपे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमामुळेच आज महिलांची प्रगती झाली आहे. महिला शिकल्यामुळे देशाची प्रगती होत आहे. सावित्रीबाईंनी त्या काळात अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला होता. आजच्या महिलांनीही त्यांचा वारसा पुढे चालवत अंधश्रद्धेचा त्याग करावा आणि विज्ञानाची प्रगती साधावी.”

या दिनाचे औचित्य साधून गावातून भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांची वेशभूषा साकारली होती, जे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. या उपक्रमातून उपस्थितांना मोठी प्रेरणा मिळाली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना बिस्किट व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला नितेश बोरकर, पुरुषोत्तम नंदूरकर, अमोल देशकर, राजेंद्र भेंदे, योगेश मांदुरकर, बिहारी नेरकर, धनंजय देशकर, अथर्व देशकर, संदेश झेलकर, कुमेश्वरी नंदूरकर, सविता नेरकर, किरण बनकर, निशा भेंदे, वरिष्ठ नागरिक जोंधरू राऊत, हरि कांबळे यांच्यासह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Popular Articles