spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी बस सेवा नियमित करा, अन्यथा तीव्र आंदोलन !

– सिहोरा परिसरातील पालकांचा आक्रमक पवित्रा; आमदार राजू कारेमोरे यांचे १५ दिवसांत सेवा सुधारण्याचे आश्वासन

हंसराज प्रतिनिधी सिहोरा :- विद्यार्थ्यांना बसेसची सेवा वेळेवर व नियमित पुरविण्यात यावी अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल असा खरमरीत इशारा विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष गजानन निनावे यांनी तुमसर एसटी महामंडळाचे शाखा व्यवस्थापक व आमदार राजू कारेमोरे यांना काल 2 जानेवारी रोजी एका निवेदना अन्वये दिला आहे.

राज्य शासनाने मानव विकास योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे होईल या दृष्टीने अहिल्याबाई होळकर ही योजना लागू करून एसटी महामंडळ तुमसर डेपोच्या वतीने फ्री पासची व्यवस्था करण्यात आली आहे. आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, संजय गांधी पूर्व माध्यमिक शाळा व आर्ट्स कॉलेज सिहोरा येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून येतात.

सिहोरा ही 40 ते 45 गावाची बाजारपेठ असून येथे विद्यार्थी व विद्यार्थिनी स. 7 ते सा. 6 वाजेपर्यंत शिक्षण घेतात परंतु विद्यार्थ्यांचे दुर्दैव की एसटी महामंडळाची बस तुमसर डेपोतून वेळेवर व नियमित येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यात काही गावांपैकी काही गावे वनपरिक्षेत्रा लगत असल्यामुळे व बसेस वेळेवर येत नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थी आपल्या गृह गावी वेळेवर पोहोचत नाही. पालक वर्गासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे.काही पालक वर्गाने तुमसर डेपोसी संपर्क साधला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे त्यांच्या मनात असंतोष खदखदु लागला आहे.विद्यार्थी शाळेत व शाळेतून घरी वेळेवर पोहोचू शकत नसल्यामुळे त्यांचा अभ्यासावर सुद्धा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.या संदर्भात शिक्षण विभाग व पालक वर्गाने अनेक वेळा निवेदन दिले परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

सदर निवेदनावर तुमसर एसटी महामंडळाचे व्यवस्थापक,तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे,विद्यार्थी पालक संघाचे अध्यक्ष गजानन निनावे,सचिव मोतीलाल ठवकर, संजय नावकर व दिनेश तुरकर यांच्यात झालेल्या चर्चेअंती 15 दिवसाच्या आत बस सेवा वेळेवर व नियमित पुरविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

Popular Articles