spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

होळीच्या दिवशी महसूल मंत्र्यांच्या उंबरठ्यावर भूमिहीनांचा एल्गार! 

– ‘सर्वांसाठी शेती’ धोरणासाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे आंदोलन

नागपूर :- राज्यातील हजारो भूमिहीन शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पडीक जमिनी कसत आहेत, परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे त्यांना अद्याप कायदेशीर मालकी हक्क मिळालेला नाही. या अन्यायाविरुद्ध ‘बिगर सातबारा शेतकरी संघटने’च्या वतीने संघटनेचे प्रणेते जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वाखाली होळीच्या दिवशी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रमुख मागण्या:

१. सरकारने तात्काळ ‘सर्वांसाठी शेती’ हे ऐतिहासिक धोरण जाहीर करावे.

२. वर्षानुवर्षे शेतीची अतिक्रमणे करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांची जमिनी नियमित करून त्यांच्या नावे सातबारा देण्यात यावा.

३. भूमिहीन शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर दर्जा द्यावा.

आंदोलनाची पार्श्वभूमी:

आज शेतकरी संकटात असताना, ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही अशा कष्टकरी वर्गाला सरकार वाऱ्यावर सोडत आहे. महसूल विभागाने यापूर्वी अनेक आश्वासने दिली, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. म्हणूनच, अन्यायाची होळी करण्यासाठी शेकडो शेतकरी मंत्र्यांच्या दारात एकत्र येणार आहेत.

“जो जमीन कसेल, त्याच्याच नावे सातबारा असावा हा आमचा हक्क आहे. जोपर्यंत शासन शेतीची अतिक्रमणे नियमित करण्याचे धोरण जाहीर करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असे प्रतिपादन संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळेयांनी केले आहे. सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास आगामी काळात संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

Popular Articles