हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिवादन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रीतसर पूजन केले आणि विनम्र अभिवादन केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कापसे यांनी संत गाडगे महाराजांच्या सामाजिक कार्याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेवर प्रहार केला आणि जनजागृती केली. ‘स्वच्छता हीच खरी समाजसेवा आहे’ हा मूलमंत्र त्यांनी देशाला दिला. केवळ शिक्षण घेऊनच एक जागरूक आणि प्रगत समाज घडवता येतो, हा विचार त्यांनी आयुष्यभर जोपासला.”
या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. पुण्यशिल टेंभूरणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. चंद्रशेखर देवघरे यांनी मानले.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता, ज्यामध्ये डॉ. सुधीर शहारे, डॉ. अनुराधा खाडे, डॉ. मनमोहन भैसारे, राकेश ऊके, बालाजी भोयर, विशाल हनवतकर, विजय शहारे, पिंटू हलमारे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




