भारतीय प्रशासनातील ‘जेंडर इक्विटी’ विषयावर व्याख्यान – विद्यापीठ लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य विभागाचे आयोजन

0
112

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य विभागाच्या वतीने ‘भारतीय प्रशासनातील ‘जेंडर इक्विटी” या विषयावर ऑनलाइन अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ऑनलाइन अतिथी व्याख्यान शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडले.

माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून हरियाणा राज्यातील हिसार येथील शासकीय महिला महाविद्यालयाच्या लोक प्रशासन विभाग प्रमुख डॉ. विजयेंद्रसिंग बेनीवाल यांची उपस्थिती होती. विभाग प्रमुख व व्याख्यानाचे संयोजक डॉ. जितेंद्र वासनिक आणि समन्वयक डॉ. सुप्रिया डेव्हिड यांनी कार्यक्रमात ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात करताना डॉ. जितेंद्र वासनिक यांनी या विषयाचे महत्त्व अधोरेखित करत लिंग आणि प्रशासन यामधील परस्परसंबंध स्पष्ट केले. शोधार्थी  मेघना मंडल यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.

डॉ. विजयेंद्रसिंग बेनीवाल यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचार प्रवर्तक व्याख्यान सादर केले. त्यांनी लिंग, समता आणि समानता या संकल्पनांचा सखोल उहापोह करत त्यांना जागतिक व राष्ट्रीय पातळीवर महिलांच्या कर्तृत्वाचे स्थान स्पष्ट केले. व्याख्यानाच्या सुरुवातीला डॉ. बेनीवाल यांनी ‘लिंग’, ‘समता’ आणि ‘समानता’ या संज्ञांमधील मूलभूत फरक स्पष्ट केला. ‘लिंग’ ही केवळ जैविक बाब नाही तर सामाजिक बांधणीवर संकल्पना आधारित असल्याचे सांगितले. ‘समता’ म्हणजे सर्वांना एकसमान वागणूक देणे, तर “समानता” म्हणजे व्यक्तींच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे. प्रशासनात लिंग न्याय समजून घेण्यासाठी ही समज अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

यानंतर डॉ. बेनीवाल यांनी महिलांचे जागतिक आणि भारतीय संदर्भातील स्थान याचे तुलनात्मक विश्लेषण सांगितले. पोलिस, न्यायपालिका आणि प्रशासकीय क्षेत्रातील विविध आकडेवारीच्या आधारे त्यांनी महिलांना अद्यापही भेडसावत असलेल्या असमानतेवर प्रकाश टाकला. त्यांनी विशेषतः “ग्लास सीलिंग” या संकल्पनेचा उल्लेख केला. आजवर भारताला एकही महिला कॅबिनेट सचिव मिळालेला नाही. याचे उदाहरण देत महिलांना उच्च पदांवर जाण्यापासून अदृश्य अडथळा रोखत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांची शासनातील भूमिका विशद करताना डॉ. बेनीवाल यांनी फिनलॅंड आणि न्यूझीलॅंडसारख्या देशांचे नेतृत्व महिलांनी यशस्वीरित्या केले असले तरी भारतातील प्रशासनात महिलांना अजूनही अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. मागील दशकभरात यूपीएससी परीक्षेत महिलांनी सातत्याने सर्वोच्च क्रमांक मिळवले आहेत. महिलांच्या क्षमतेचे आणि चिकाटीचे प्रतीक आहे. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. बेनीवाल यांनी अचूक आणि सखोल उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी, डॉ. सुप्रिया डेव्हिड यांनी व्याख्यानाबाबत आपले समारोपीय मनोगत व्यक्त केले. या व्याख्यानात सैद्धांतिक स्पष्टता आणि अनुभवजन्य पुरावे यांचा समतोल साधून भारतीय प्रशासनातील लिंग समानतेच्या प्रगती व अडचणी यांचा परामर्श घेतला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यान विद्यार्थी, संशोधक आणि लोकप्रशासनाच्या अभ्यासकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीवर्धन केकातपूरे यांनी केले तर आभार डॉ. सुप्रिया डेव्हिड यांनी मानले. ऑनलाईन व्याख्यानाला सुमारे ५० सहभागी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अंकुश मराठे आणि प्रा. रमन शिवणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.