– लोकप्रशासन व स्थानिक स्वराज्य शासन विभागाचे आयोजन
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन व स्थानिक स्वराज्य शासन विभागाच्या वतीने’ तणाव व्यवस्थापन’ या विषयावर शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी अतिथी व्याख्यान पार पडले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूरचे माजी प्राचार्य डॉ. अनिल करवंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभाग प्रमुख तथा व्याख्यान संयोजक डॉ. जितेंद्र वासनिक यांनी भूषविले, कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूरचे माजी प्राचार्य डॉ. अनिल करवंदे, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूरचे माजी कुलसचिव डॉ. भास्कर गणवीर, समन्वयिका डॉ. सुप्रिया डेव्हिड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत गायनाने झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण केले.
प्रास्ताविक करताना डॉ. सुप्रिया डेव्हिड यांनी तणाव या विषयाची जाणीव करून दिली. आजच्या गतिमान जगात त्याचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला. डॉ. भास्कर गणवीर यांनी तणाव समजून घेणे व त्यावर उपाययोजना आखणे याची आवश्यकता अधोरेखित केली. यानंतर श्रीवर्धन केकतपुरे यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली.
वास्तव जीवनातील उदाहरणांनी सुरुवात करत डॉ. अनिल करवंदे यांनी मानसशास्त्राच्या दृष्टीने तणाव या संकल्पनेचे स्पष्टीकरण केले. तणावाचा अनुभव घेताना मानसिक व शारीरिक दडपणांची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, विचार व कृतीसाठी वेळ दिल्यास विवेकबुद्धी जपली जाते व तणावाचे संपूर्ण निर्मूलन शक्य नसले तरी त्यावर उपाय मिळू शकतो. यूस्ट्रेस (सकारात्मक तणाव) व डिस्ट्रेस (नकारात्मक तणाव) या प्रकारांवर भाष्य करताना त्यांनी जीवनात पुढे जाण्यासाठी तणावकारक घटक (Stressors) आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
कार्यपद्धती, सामाजिक तसेच वैयक्तिक कारणांमुळे तणाव उद्भवतो व तो टाळता येत नाही. परंतु त्यामागील कारणे समजून घेऊन शांतपणे विचार केल्यास त्यावर उपाय मिळू शकतो असे त्यांनी सांगितले. वेळेचे नियोजन, ध्यान व योगाभ्यासाद्वारे हे साध्य होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. क्रिकेटमधील राहुल द्रविड व महेंद्रसिंग धोनी यांच्या उदाहरणांचा उल्लेख करत जीवनातील विविध प्रसंगांत शांत राहण्याचे व परिस्थितीची कारणे समजून घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “तणाव हाताळण्यासाठी धैर्य, चिकाटी व मार्गदर्शनाची गरज असते. तणाव व्यवस्थापन ही एक क्रमाक्रमाने शिकण्याची प्रक्रिया आहे, ती तयार स्वरूपात उपलब्ध होत नाही; त्यासाठी स्वतःला तयार करणे आवश्यक आहे”, असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. जितेंद्र वासनिक यांनी गौतम बुद्धांची एक कथा सांगत विविध परिस्थितींमध्ये तणाव व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन श्रीवर्धन केकतपुरे यांनी केले तर आभार अंकुश मराठे यांनी मानले. कार्यक्रमाला विभागातील प्रा. रमण शिवणकर, शिक्षकेतर कर्मचारी अनुसया पाटील, समीक्षा मेहर व संदीप बोरकर यांचे सहकार्य लाभल्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.




