सिरोंजी येथे बिबट्याचा मृत्यू, टीटीसी येथे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार

0
63

खापा, १४ :   खापा वनपरिक्षेत्रातील नागलवाडी उपक्षेत्रातील नागलवाडी अंतर्गत सिरोंजी येथील एका शेतात मृत बिबट्याचा मृतदेह आढळला. परंतु तपासणी केली असता वन्य प्राण्याचे सर्व अवयव शाबूत आढळल्याने शिकारीची शक्यता संपली. ही घटना बुधवार, 9 जुलै रोजी संध्याकाळी उघडकीस आली. बिबट्याचे वय अंदाजे दहा ते बारा वर्ष असल्यामुळे त्याचा मृत्यू वयोवृद्ध झाल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मौजा-सिरोंजी येथील नागलवाडी जवळील रेखा गिरमेकर यांच्या शेतात खापाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले यांना बिबट्याचा मृतदेह आढळल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्यात आला. परंतु सायंकाळी सहा नंतर शवविच्छेदन करत येत नसल्यामुळे नंतर बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे आणण्यात आला. जिथे गुरुवारी वन अधिकारी आणि टीटीसी समन्वयक कुंदन हाटे यांच्या उपस्थितीत बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत बिबट्याचे सर्व अवयव शाबूत आढळले. यामुळे, वन्य प्राण्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोस्टमॉर्टेमनंतर, नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

यावेळी सहाय्यक वन संरक्षक नागपूर एस एम काटे, खापा वन परिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले, नागलवाडी राऊंड ऑफिसर विनोद राऊत, वनरक्षक वाहने, कुकलारे आदी कर्मचारी उपस्थित होते.