– बिबट्याने घेतला सात बकऱ्यांच्या नरडीच्या घोट
– वाघामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील देवलापार परिसरातील घोटी व उसरीपार येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घोटी येथे काल रात्री बिबट्याने गोविंदा सरवरे यांचे घरच्या गोठ्यात शिरून तब्बल सात बकऱ्यांचा बळी घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने रात्रीच्या सुमारास गोठ्यात शिरून दोन बकऱ्या उचलून नेल्या, तर पाच बकऱ्या गोठ्यातच मृत अवस्थेत आढळून आल्या. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशीही बिबट्या पुन्हा त्या परिसरात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, याबाबत सरवरे यांना नुकसान भरपाई द्यावी व त्या बिबट्याचा बंदोबस्त करावी अशी मागणी करण्याचे निवेदन वनपरीक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांना करण्यात आली. वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, अशी मागणी उसरीपार ग्रामस्थांकडून केली जात आहे. तसेच, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याकरीता नागकरीकांनी पवनी एकसंघ नियंत्रकचे वनपरीक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांना निवेदन देवून त्या वाघाचा बंदोबस्त करन्याची विनंती केली. यावेळी देवलापार परीक्षेत्र जनहीत संरक्षण समितीचे विजय कोकोडे, सरपंच प्रविण उईके, चंद्रकांत कोडवते, विक्की सिंद्राम आदी उपस्थीत होते.
आंब्याच्या झाडाखाली वाघ बसलेला होता
उसरीपार गावानजीक शाळेला लागून प्रकाश कुमरे यांचे शेत आहे.शेतात उन्हाळी धान व ईतर पीक आहे. मंगळवार (दि.२४) सकाळी ८ चे सुमारात प्रकाश कुमरे हे शेतात पिकाला पाणी देण्याकरीता गेले असता शेतातील आंब्याच्या झाडाखाली वाघ बसलेला होता. प्रकाश घाबरले त्यांनी जोरात आरडाओरड केली. गावाला लागूनच शेत असल्याने लगेच गावातील नागरीक काठ्या घेवून धावले.असता तो वाघ बाजूच्या एका झूडपात गेला. गावकऱ्यांनी मोठ्याने आरडाओरड केली तसेच कुत्रे देखील भूंकू लागले परंतू तो त्या झूडपात दबा धरून बसला होता. लागलीत नागरीकांनी सरपन पेटवले. त्यानंतर वाघ घाबरून जंगलाच्या दिशेने पळून गेला त्यानंतरच नागरीकांनी मोकळा श्वास घेतला.