– विदर्भातील प्रतिष्ठित पत्रकारिता पुरस्काराचे वितरण
नागपूर :- विदर्भातील पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांना गौरविणारा प्रतिष्ठित ‘स्वर्गीय अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार’ वितरण सोहळा रविवारी नागपूर प्रेस क्लब येथे उत्साहात पार पडला. यंदाचा पुरस्कार ‘लोकमत’चे उपमुख्य संपादक नरेश डोंगरे, वरूड येथील ‘दैनिक कॅलिफोर्निया टाइम्स’चे मुख्य संपादक गिरीधर देशमुख आणि ‘लोकसत्ता’चे विशेष प्रतिनिधी मोहन अटाळकर यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी २१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असे आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शरद पाटील होते. व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, प्रेस क्लबचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रदीप कुमार मैत्र, ‘महासागर’चे संपादक श्रीकृष्ण चांडक, निलेश खांडेकर आणि प्रगती पाटील उपस्थित होते. विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार दशकांपासून या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे स्व.अनिलकुमार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

प्रमुख पाहुणे डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले, महाराष्ट्राला पत्रकारितेची गौरवशाली परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्यलढा असो किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, वृत्तपत्रांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. जुन्या पिढीतील पत्रकारांच्या पायावरच आजची पत्रकारिता उभी आहे. आजही जनतेचा पत्रकारितेवरील विश्वास कायम आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा.शरद पाटील यांनी पत्रकारितेतील विश्वासार्हतेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. गिरीश गांधी आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी प्रास्ताविकातून पुरस्काराची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन रेखा दंडिगे यांनी केले, तर आभार निलेश खांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.





