मुंबई :- महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील आरोपीला रायपूरला नेण्यासाठी ‘ट्रान्झिट रिमांड’ देण्यास नकार देणारा विशेष न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. आरोपीला ताब्यात घेतल्यापासून २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर केले असेल, तर त्याला पहिल्याच सत्रात किंवा दुपारी दोनपूर्वी हजर करायला हवे होते, असा स्वतंत्र निकष लावू नये, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाचा आदेश रद्द केला. आरोपीस अटक करून योग्य न्यायालयासमोर हजर करण्याची मुभाही ईडीला दिली.
बेटिंग ॲप प्रकरणात हिमांशू शेखर ऊर्फ मोहित याच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. २० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०३ वाजता मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. त्यानंतर रायपूर येथील ईडीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले. २१ नोव्हेंबर रोजी पहाटे १.१० वाजता त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर दुपारी १२.५१ वाजता अटक करून त्याच दिवशी दुपारी २.४५ वाजता विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला रायपूरला नेऊन तेथील विशेष न्यायालयासमोर हजर करण्यासाठी ईडीने ट्रान्झिट रिमांड मागितली होती.
न्यायालयातील युक्तिवाद
आरोपीला विमानतळावर रोखण्यात आलेल्या वेळेपासून २४ तासांची मुदत मोजली पाहिजे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पहिल्या सत्रातच न्यायालयात हजर करायला हवे होते. संपूर्ण रात्र आरोपी ईडीच्या ताब्यात असताना दुपारी दोन वाजण्यापूर्वी त्याला हजर न करणे योग्य नाही, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने २१ नोव्हेंबरला ट्रान्झिट रिमांडचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. आरोपीला ताब्यात घेतल्यापासून २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यामुळे संविधानाच्या अनुच्छेद २२(२) मधील तरतुदीचे पालन झाले आहे, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला.
आदेश कायदेशीरदृष्ट्या योग्य
न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने आरोपीला २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर केल्याची बाब अधोरेखित केली. तसेच ट्रान्झिट रिमांड नाकारण्यासाठी अन्य कोणतेही कारण नसेल, तर आरोपीला संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यासाठी ती मंजूर करणे आवश्यक आहे. तर, विशेष न्यायालयाने आरोपीला २३ नोव्हेंबर रोजी रायपूर येथील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तो तेथेही हजर झाला नाही. या बाबीची नोंद घेत न्यायालयाने ईडीचा अर्ज मंजूर केला.






