spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘महाज्योती’चा क्यूआर कोड बनला विद्यार्थ्यांच्या यशाची सुवर्णकिल्ली

स्कॅनरद्वारे ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर
1 कोटी विद्यार्थ्यांच्या भेटींचा डिजिटल विक्रम

मुंबई ८ :  ज्ञानाची दारे आता एका क्लिकवर उघडतात आणि स्वप्नांची उड्डाणे ‘महाज्योती’च्या स्कॅनर कोडमधून सुरू होतात  असे चित्र आज राज्यभर दिसत आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) ही ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आज आशेचा दीपस्तंभ ठरली आहे. विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करण्याच्या हेतूने ‘महाज्योती’ने विविध योजनांची माहिती पोहचण्याकरिता www.mahajyoti.org.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. ‘महाज्योती’च्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना जलद आणि सोप्या पद्धतीने पोहचण्याच्या उद्देशाने संस्थेने 24 जुलै 2024 रोजी मोबाईलचे क्यूआर कोड स्कॅनर तयार केले. अत्याधुनिक असलेले या स्कॅनर कोडवर तसेच https://mahajyoti.org.in/schemes/ या संकेतस्थळावर एका कोटीहून अधिक भेटी झाल्या असून हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याने विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहाचे प्रतिबिंब उमटले आहे. अशी माहिती ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक मा. मिलिंद नारिंगे यांनी दिली.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे मा. मिलिंद नारिंगे यांनी सांगितले की, ‘महाज्योती’द्वारे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, यूपीएससी, एमपीएससी, पायलट ट्रेनिंग, पीएच.डी., स्किल डेव्हलपमेंट अशा विविध परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. केवळ प्रशिक्षणच नव्हे तर गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून अर्थसहाय्य पुरवले जाते. या उपक्रमामुळे आज राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. मोबाईलच्या स्कॅनरने विद्यार्थ्यांना सर्व योजनांची माहिती एका क्लिकवर मिळावी, या उद्देशाने 24 जुलै 2024 रोजी क्यूआर कोड स्कॅनर सुरू करण्यात आला. त्यानंतर फक्त 13 महिने 15 दिवसांत लाखो विद्यार्थ्यांनी या कोडद्वारे संकेतस्थळाला भेट दिली. ‘महाज्योती’चे संकेतस्थळ www.mahajyoti.org.in तसेच थेट https://mahajyoti.org.in/schemes/ वर विद्यार्थ्यांनी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून घेतली. आज या संकेतस्थळावरील भेटींची संख्या 1 कोटी 55 हजार 802 च्यावर पोहोचली आहे. मा. मिलिंद नारिंगे यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून संस्थेच्या दर्जेदार प्रशिक्षणामुळे आणि विद्यावेतनाच्या पाठबळामुळे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून ‘महाज्योती’च्या योजनांची माहिती अधिक सुलभ झाली असून एका कोटींचा टप्पा विद्यार्थ्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. प्रत्येक विद्यार्थी आता ‘महाज्योती’च्या संकेतस्थळाला उत्सुकतेने भेट देतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत मा. मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केले आहे.

डिजिटल मंचावर उजळला ‘महाज्योती’चा ज्ञानप्रकाश : मंत्री अतुल सावे

महाज्योती’च्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक नवा डिजिटल क्रांतीचा अध्याय लिहिला गेला आहे. क्यूआर कोडसारख्या सोप्या पण प्रभावी साधनाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची दिशा निश्चित केली आहे. ही केवळ तांत्रिक सोय नसून, शिक्षण आणि संधी यामधील दरी कमी करणारा, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांशी जोडणारा पूल आहे, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री व ‘महाज्योती’चे अध्यक्ष मा. अतुल सावे यांनी व्यक्त केला. मा. अतुल सावे यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’ हे केवळ एक प्रशिक्षण संस्था नसून, भविष्य उजळवणारे दीपस्तंभ आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून विद्यार्थी एका क्लिकवर आपले भविष्य घडविणाऱ्या योजना, मार्गदर्शन आणि संधीपर्यंत पोहोचत आहेत, ही बाब खरोखरच समाधान देणारी आहे. आजच्या काळात जे विद्यार्थी डिजिटल साधनांचा योग्य वापर करतील, मेहनतीने ज्ञान संपादन करतील आणि आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करतील, त्यांनाच स्पर्धात्मक युगात यश संपादन करता येईल. त्यामुळे ‘महाज्योती’ने उभारलेला हा डिजिटल पूल हा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आधारस्तंभ ठरणार आहे, असेही मा. अतुल सावे म्हणाले.
‘महाज्योती’ने केवळ प्रशिक्षण किंवा विद्यावेतन पुरवले नाही तर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी धार दिली आहे. त्यामुळे आज लाखो विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या भविष्यासाठी सज्ज होत आहेत. हा उपक्रम राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी मोलाचा टप्पा आहे. मला ठाम विश्वास आहे की, या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या क्षमतांना नवे पंख लावतील आणि उज्ज्वल भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान देतील. ‘महाज्योती’चा हा उपक्रम खरोखरच अभिनंदनास पात्र आहे, असेही मा. अतुल सावे यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.